Ambabai Temple | सुवर्ण कळसाने झळाळले अंबाबाई मंदिराचे शिखर  
कोल्हापूर

Ambabai Temple | सुवर्ण कळसाने झळाळले अंबाबाई मंदिराचे शिखर

अधिकमासातील शुक्रवारच्या पहाटे नवे पर्व; कळसाचे तेज पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस चढवण्याची मोहीम शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता पूर्ण झाली. दीड किलो सोन्यापासून घडवलेल्या या अडीच कोटी मूल्याच्या सोन्याच्या कळसाने अंबाबाई मंदिराच्या शिखराला आलेले तेज पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी हा सोन्याचा कळस पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केला. गुरुवारी रात्रभर कळस चढवण्याची प्रक्रिया सुरू होती.

अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पांतर्गत संवर्धनाची कामे सुरू आहेत. मंदिराच्या शिखरावर पावसाचे पाणी झिरपत असल्याने दगडी भागावर झुडपे आणि गवत उगवू लागले होते. त्यामुळे शिखराच्या संरक्षणासाठी तांब्याचे संरक्षक आवरण बसविण्याची योजना तयार करण्यात आली होती. दरम्यान, अंबाबाईचे भाविक असलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी सोन्याचा कळस दान देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर या योजनेला नवे स्वरूप प्राप्त झाले. मंगलोर येथील कारागिरांनी दीड किलो सोन्यापासून हा कळस तयार केला आहे. शुक्रवारी दिवसभर सोन्याचा कळस पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. सध्या मंदिरात संवर्धनाची कामे सुरू असल्यामुळे सोन्याच्या कळसाचा पूजन विधी संवर्धनाच्या कामांची पूर्तता झाल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे सचिव शिवराज नायकवडी यांनी दिली.

११ भाग...१ घुमट... ७ तास अन् ३० कारागीर

गुरुवारी ११ जूनच्या रात्री अंबाबाई मंदिर परिसरात एक आगळावेगळा सोहळा रंगला होता. परंपरा, इतिहास, श्रद्धा आणि कौशल्य यांचा अद्भुत संगम जणू त्या रात्री प्रत्यक्ष आकार घेत होता. ११ भाग, एक घुमट असे स्वतंत्र बारा भाग शिखरावर चढवण्यासाठी ३० कारागीरांची कसोटी लागली होती. अखेर सात तासांच्या अथक प्रयत्नांती सोन्याचा कळस अंबाबाई मंदिराच्या शिखरावर विराजमान झाला अन् अधिकमासातील शुक्रवारची सकाळ उगवली ती अंबाबाईचे शिखरावर सोन्याचे तेज घेऊनच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT