कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तसे पत्र उच्चाधिकार समितीकडून आले आहे. यामुळे येत्या महिनाभरात या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ होईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणार्या भूसंपादनाचे धोरण आणि कार्यपद्धती ठरविण्यासाठी नगर विकास विभागाचे (क्रमांक 1) अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीचीही स्थापना करण्यात आली.
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्य मंत्रिमंडळाच्या चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे 6 मे रोजी झालेल्या बैठकीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या 1445.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला तर श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील 259.59 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 28 मे रोजी जोतिबा विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली. त्याचे कामही सुरू झाले.
अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याची उच्चाधिकार समितीच्या बैठकीत छाननी झाली नव्हती. यामुळे या आराखड्याची प्रशासकीय मान्यता लांबली होती. दरम्यान 15 जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत भूसंपादनाबरोबरच पहिल्या टप्प्यातील 143 कोटींच्या कामांचेही सादरीकरण झाले. त्याला बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार 143 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून लवकरच त्याबाबतचा प्रशासकीय मान्यतेचा आदेश काढला जाईल. विकासकामांना मंजुरी दिल्याने त्यानूसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार असून त्यानंतर या 143 कोटींच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याचेही येडगे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यातील 143 कोटींच्या कामात अंबाबाई मंदिर आणि परिसरातील मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची सर्व कामे केली जाणार आहेत. मंदिर परिसरात 64 योगिनींच्या मूर्ती आहेत. त्यांचेही जतन व संवर्धन या निधीतून केले जाणार आहे. मंदिर आणि परिसरातील डागडुजी, वॉटरप्रूफिंग, विद्युत आणि ड्रेनेज व्यवस्थेशी संबधित कामेही यावेळी केली जाणार आहेत. त्याचा पुरातत्त्व विभागाकडून आराखडा तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे.