कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी अंबाबाई मंदिराच्या अंतर्भागासह गाभाऱ्याची स्वच्छता पूर्ण करण्यात आली. गाभारा स्वच्छतेसाठी दिवसभर मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. तसेच चांदीची पालखी, सिंहासनासह पूजेच्या चांदीच्या वस्तूंनाही स्वच्छतेनंतर झळाळी आली.
साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात ११ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सव सुरू आहेत आहे. गेल्या चार दिवसांपासून नवरात्रौत्सवाच्या तयारीने वेग घेतला आहे. आय स्मार्ट कंपनीच्या वतीने मोफत स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराचा बाह्यपरिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेसोबतच ओवऱ्यांच्या लाकडी दरवाजांना पॉलिश करण्यात आले आहे. दर्शनरांगेत पाणी, फॅनची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. विद्युत रोषणाईसाठी वायरिंग जोडणीही अंतिम टप्प्यात आली आहे.
गाभारा लखलखला
सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मंदिराच्या आतील गणपती चौक, कासव चौक, पेटी चौक तसेच मुख्य गाभारा वॉटरगनच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आला. प्रथेनुसार या काळात अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर इरलं पांघरण्यात आले होते. तसेच सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दिवसभर गर्दी होती. सायंकाळी साडेसहानंतर अंबाबाईचा गाभारा उघडण्यात आला.
पूजेतील चांदीच्या वस्तूंना झळाळी
नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या पूजाविधीसाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या वस्तू, तसेच पालखी, सिंहासन यांची दरवर्षी स्वच्छता केली जाते. सोमवारी दिवसभर मंदिराच्या आवारात सुरक्षा व्यवस्थेच्या नजरेखाली हे काम पूर्ण करण्यात आले. यामध्ये चांदीची पालखी, सिंहासन, चौरंग, कटांजन, धुपारती, अब्दागिरी, प्रभावळ, पूजेचा गणपती, समई, निरांजने, तबक यांना झळाळी आली. १२ कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पूर्ण झाली. अलंकारांच्या स्वच्छतेचे काम मंगळवारी (दि. ६) करण्यात येणार आहे. यामध्ये देवीचे पारंपरिक दागिने स्वच्छ केले जाणार आहेत.