कोल्हापूर : उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना पायांना चटके बसू नयेत म्हणून देवस्थान व्यवस्थापनाने मॅटची सोय केली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून उन्हाचा वाढता पारा लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने मंदिर आवारात पाच ठिकाणी मंडप उभारणी केली आहे. त्यामुळे पायाच्या गारव्यासोबत डोक्यालाही थंडावा मिळाल्याने अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची दर्शनवारी सुसह्य होत आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्याने मार्च महिन्याच्या मध्यापासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. दुसरीकडे उन्हाचा कडाखाही 35 अंशांपासून आता 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिन्यापासून देवस्थान व्यवस्थापनाने मंदिरात घाटी दरवाजा, मुख्य दर्शन रांग, मुखदर्शन रांग तसेच पूजासाहित्य दुकानांसमोरील परिसरात काथ्याचे मॅट घातले आहेत. मॅट थंड राहावेत, यासाठी वापरून झालेल्या पाण्याचे फवारे मारले जात आहेत. मात्र, गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीवता जास्तच वाढली आहे. भाविकांच्या पायांना जरी मॅटमुळे गारवा मिळत असला, तरी मंदिराच्या आवारात फिरताना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात. यावर मार्ग काढण्यासाठी देवस्थानने मंडप उभारणी केली आहे.
‘या’ भागांत मंडपामुळे मिळतोय थंडावा
घाटी दरवाजासमोरील भाग, साक्षी विनायक मंदिरासमोरील दर्शन रांग, पूजा साहित्य दुकानांसमोरील भाग, देवस्थान कार्यालयासमोरील भाग, दक्षिण दरवाजाबाहेरील बँक लॉकर व चप्पल स्टँड आवार, विद्यापीठ हायस्कूल दरवाजा परिसर, महाद्वार दरवाजाबाहेरील भाग हा सर्व परिसर मंडपाने आच्छादित केला आहे.