अनुराधा कदम
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना मानल्या जाणार्या किरणोत्सवाच्या यंदा उत्तरायण पर्वात गेल्या 25 वर्षांत प्रथमच खंड पडल्याने भाविकांसह अभ्यासकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ढगाळ हवामान, हवेतील वाढते प्रदूषण की सध्या सुरू असलेल्या गरुड मंडपाच्या नूतनीकरणातील खांबांची रचना? किरणोत्सव सोहळ्याच्या आड नेमकं येतंय तरी काय, याचा शोध तज्ज्ञांकडून घेतला जात आहे.
अंबाबाई मंदिरात दरवर्षी दक्षिणायन आणि उत्तरायण पर्वात किरणोत्सव साजरा होतो. सूर्यास्ताच्या वेळी मावळतीची सूर्यकिरणे थेट अंबाबाईच्या मूर्तीवर पडतात. ही या किरणोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. मंदिराच्या स्थापत्यशैलीतील ही किमया पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक मंदिरात गर्दी करतात. 31 जानेवारी, 1 व 2 फेब्रुवारी या तीन दिवसांच्या उत्तरायण किरणोत्सव कालावधीत एकाही दिवशी सूर्यकिरणे गाभार्यात पोहोचू शकली नाहीत. ढगाळ वातावरण किंवा प्रदूषण असले, तरी तीन दिवसांपैकी किमान एका दिवशी तरी किरणोत्सव होतोच हा आजवरचा अनुभव आहे. मात्र, यंदा यातील एकही दिवस किरणोत्सव झाला नाही.
तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंग इमारतीच्या बांधकामामुळे हवेत धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच परिसरात कचरा जाळणे, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून होणारा धूर आणि एकूणच हवेतील प्रदूषित घटक यामुळे सूर्यकिरणांच्या प्रवासात अडथळा येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व कारणांपेक्षा अधिक गंभीर मुद्दा काही अभ्यासकांनी अधोरेखित केला आहे. तो म्हणजे, सध्या सुरू असलेल्या गरुड मंडपाच्या नूतनीकरणाची रचना. नोव्हेंबरमधील दक्षिणायन किरणोत्सवावेळी गरुड मंडपाचे काम प्राथमिक टप्प्यात होते आणि खांब उभारलेले नव्हते; मात्र आता उभारण्यात आलेले खांब, मंडपाची उंची आणि त्याची मांडणी किरणोत्सवाच्या मार्गात अडथळा ठरत असल्याची शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.