कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण किरणोत्सवाला शुक्रवारपासून भक्तिभावात प्रारंभ झाला. मात्र किरणोत्सवाच्या मुख्य दिवशी शनिवारी (दि. 31) ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणांची तीव्रता कमी राहिल्याने मावळतीची सूर्यकिरणे मंदिरातील गरुड मंडपाच्या सदरेपर्यंतच पोहोचली. परिणामी, भाविकांना प्रत्यक्ष किरणोत्सवाचा पूर्ण अनुभव घेता न आल्याने अनेकांची निराशा झाली.
दरवर्षी दक्षिणायन व उत्तरायण काळात सलग तीन दिवस साजरा होणारा हा अद्वितीय खगोल व धार्मिक सोहळा कोल्हापूरची सांस्कृतिक ओळख मानला जातो. या काळात मावळत्या सूर्याची किरणे थेट मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करून अंबाबाईच्या मूर्तीवर पडतात. परंपरेनुसार पहिल्या दिवशी देवीच्या चरणांवर, दुसर्या दिवशी कमरेपर्यंत आणि तिसर्या दिवशी मुखावर सूर्यकिरणांचा स्पर्श होतो. मात्र देवस्थान समितीच्या निर्णयानुसार गेल्या काही वर्षांपासून हा किरणोत्सव पाच दिवस साजरा केला जात आहे.
शनिवार हा किरणोत्सवाचा मुख्य दिवस असतानाही प्रतिकूल हवामानामुळे किरणांचा अपेक्षित प्रवास पूर्ण होऊ शकला नाही. सकाळपासूनच आकाशात ढगांची दाटी असल्याने सूर्यकिरणांची तीव्रता कमी राहिली. त्यामुळे किरणे गाभार्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला. किरणोत्सव सोमवार, दि. 2 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून उर्वरित दिवसांत हवामान अनुकूल राहिल्यास भाविकांना देवीवर पडणार्या सूर्यकिरणांचे अलौकिक दर्शन घडेल, अशी आशा देवस्थान समितीने व्यक्त केली आहे.