कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि वैशाख महिन्यातील महत्त्वाचा सण असलेल्या अक्षयतृतीयेनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा दोलोत्सव सोहळा बुधवारी (दि. 30) प्रथेनुसार धार्मिक व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. गरुड मंडपाच्या सदरेवर तात्पुरता मंडप उभारून याठिकाणी फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यात अंबाबाईची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. फळे व फुलांनी देवीची आरास करण्यात आली होती. दोलोत्सव सोहळ्यातील अंबाबाईचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्रीपूजक यांच्या वतीने अंबाबाईचे सण-समारंभात परंपरेनुसार विधी केले जातात. अक्षयतृतीयेला अंबाबाई फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यात आसनस्थ केली जाते. बुधवारी सकाळपासूनच या सोहळ्याची तयारी सुरू होती. दुपारी दोन वाजल्यापासून गरुड मंडपातील सदरेवर झुला बांधून त्यावर फुलांची सजावट करण्यात आली. भरजरी वस्त्र व जडावी अलंकारांनी सजलेली अंबाबाईची उत्सवमूर्ती या झोपाळ्यावर प्रतिष्ठापित करण्यात आली. चार वाजता हा सोहळा झाला. आरती झाल्यानंतर अंबाबाईचे झोपाळ्यावरील पूजा पाहण्यासाठी रात्रीपर्यंत भाविकांची रीघ लागली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई यांच्यासह श्रीपूजक यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला.
अक्षयतृतीयेच्या अंबाबाईच्या दोलोत्सवासाठी वाटलेली कैरी, डाळ आणि पन्हं असा प्रसाद भाविकांना वाटप केला जातो. सायंकाळी पाच वाजल्यानंतर मंदिरात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.