कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनंतर कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई आणि शिवछत्रपती व ताराराणी यांच्या रथोत्सवाची परंपरा आहे. त्यानुसार यंदाही रथोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवारी जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस होता. त्यामुळे दुसर्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 13) अंबाबाईच्या रथोत्सवाची नगरप्रदक्षिणा होणार आहे. तर सोमवारी (दि.14) शिवछत्रपती व ताराराणी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही रथोत्सवांची सुरुवात रात्री 9 वाजता होईल.
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या रथोत्सवाची जय्यत तयारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती तर्फे, तर शिवछत्रपती व ताराराणी यांच्या रथोत्सवाची तयारी छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे. या दोन्ही रथोत्सवांच्या निमित्ताने महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट, न्यू गुजरी मित्र मंडळ, मावळा कोल्हापूर, बालगोपाल तालीम, सराफ संघ, शाहू मॅरेथॉन, फेरीवाला संघटना, महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी संघटना यासह तालीम संस्था-तरुण मंडळे यांच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले आहे.
रथोत्सवानिमित्त महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे महाद्वार चौक ते जोतिबा रोड चौक मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई व नेत्रदीपक आतषबाजी करण्यात येणार आहे. यात 80 कॅनेटिक बॉल, 90 फूट ट्रस,, एम. आय. बार लाईट, ब्लेडर लाईट, एलईडी लाईट, स्मोक मशिन व इतर लाईटस्चे आकर्षण असणार आहे. याशिवाय महालक्ष्मी भक्त मंडळ व महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे जोतिबा यात्रेकरूंसाठी मोफत झुणका-भाकर उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवार, दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता अंबाबाई मंदिर परिसरातील रामाचा पार येथे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ होईल.
अंबाबाई रथोत्सव मार्गावर कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सांगली येथील कलाकार रांगोळी रेखाटणार आहेत. या कलाकारांना गुजरी मित्र मंडळाच्या वतीने 1500 किलो संस्कार भारतीची रांगोळी पुरवण्यात येणार आहे. तसेच गुजरी कॉर्नर ते जोतिबा रोड कॉर्नर या मार्गावर आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. भाविकांना साजूक तुपातील अडीच हजार किलोचा शिरा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किरण नकाते यांनी केले आहे.
कोल्हापूरचा पुरोगामी वारसा व हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपत बाबासाहेब कासीम मुल्ला यांनी रथोत्सवासाठी अनोखी सेवा गेली 25 वर्षे अखंड सुरू ठेवली आहे. अंबाबाई आणि शिवछत्रपती-ताराराणी यांच्या रथोत्सवावर मुल्ला यांच्याकडून दरवर्षी पुष्पवृष्टी केली जाते. बालगोपाल तालीम मंडळ परिसरातील भोसले प्लाझा इमारतीवरून मुल्ला ही पुष्पवृष्टी करतात. आज वयाच्या 75 वर्षातही ही सेवा त्यांनी कायम सुरू ठेवली आहे.
अंबाबाईचा रथ रविवारी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. या मार्गावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. दुपारी चारनंतर या मार्गावरून जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितले.