कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा अष्टमीचा जागर आणि नगर प्रदक्षिणेचा सोहळा मंगळवार, दि. 30 रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून रात्री नऊ वाजता शार्दुल वाहनातून अंबाबाई नगर प्रक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. हा सोहळा पाहण्याची आस हजारो भाविकांना लागली आहे.
साडेतीन शक्तीपीठांतील एक पीठ दक्षिणकाशी कोल्हापुरात नवरात्रौत्सव विविध धार्मिक विधी व प्रथापरंपरांनुसार साजरा केला जात आहे. अष्टमीच्या जागरानिमित्ताने गेल्या अनेक पिढ्यांपासून अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा साजरा होतो. मंगळवारी रात्री नउ वाजता फुलांनी सजवलेल्या रथाचे पूजन करण्यात येईल. भालदार चोपदार यांच्यासह पारंपरिक लवाजम्याच्या साथीने ललकारी दिल्यानंतर अंबाबाईचा रथ महाद्वारातून बाहेर पडणार आहे. गुजरी, भवानी मंडप, खासबाग, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेशमंदिर, महाद्वार रोडमार्गे नगरप्रदक्षिणा पूर्ण होईल. अष्टमीला देवीचा जागर असल्याने देवीची शेजारती केली जात नाही.
नवरात्रौत्सवातील पंचमीला अंबाबाईने कोल्हासुराचा वध करुन सर्वांना संरक्षण दिले. कोल्हासुराच्या संहारानंतर आता सर्व काही व्यवस्थित आहे, घाबरु नका असं सांगून नगरीवासियांना आश्वस्त करत दर्शन देण्यासाठी अंबाबाई अष्टमीदिवशी बाहेर पडली होती. तोच दिवस आजही नगरप्रदक्षिणा सोहळ्याने साजरा केला जातो.
अंबाबाईच्या रथाचे स्वागत करण्यासाठी गुजरी स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील हौशी कलाकारांकडून रांगोळ्या व फुलांच्या पायघड्या घालण्याची तयारी सुरु झाली आहे. फुलांच्या कमानी तयार करण्यात आल्या आहेत, तसेच फुलांच्या आकारातील हत्तीही या सोहळ्यात लक्ष वेधून घेणार आहे.