कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी नवी दिल्ली येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले. सोमवारी (दि. 11) व मंगळवारी (दि. 12) हे दोन दिवस संवर्धन प्रक्रियेच्या कारणास्तव भाविकांसाठी अंबाबाईचे दर्शन बंद राहणार असून उत्सवमूर्ती व कलश मुख्य गर्भगृहाबाहेर पेटी चौकात ठेवण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत धार्मिक विधी पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर संवर्धन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
सोमवारी सकाळी साडेआठ वाजता अंबाबाई मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर आरती करून शंखतीर्थ विधी केला जाईल. धार्मिक विधींद्वारे देवीतत्त्व कलश व उत्सवमूर्ती गर्भगृहाबाहेर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीपूजक माधव मुनिश्वर यांनी दिली. 13 ऑगस्ट रोजी पुन्हा देवीतत्व कलशाचे धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सकाळी 10 वाजल्यानंतर भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञ पथकाद्वारे मूर्तीची सद्य:स्थिती पाहणी होईल. 2015 साली झालेल्या संवर्धन प्रक्रियेचा आढावा घेतला जाणार आहे. मूर्तीवर असलेली नैसर्गिक झीज, धूळ, हवामानजन्य परिणाम तपासले जाणार आहेत. मूर्तीच्या दीर्घकालीन जतनासाठी रासायनिक उपाययोजना केल्या जाणार आहेत.