आशिष शिंदे
कोल्हापूर : कोल्हापुरातील मानाचा गणेशोत्सव अशी बिरूदावली मिरविणारा अंबाबाईचा गणपती अर्थात श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचा गणपती. धार्मिक उपक्रमांनी व पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव अशी याची आणखी एक वेगळी ओळख आहे. या गणेशाचे आगमन व विसर्जन ज्या रथातून होते तो रथ भाविक ओढतात, ही परंपरा कायम आहे. वैशिष्ट्यपूर्ण बैठी व पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती हे याचे वेगळेपण आहे. या गणपतीच्या स्थापनेची सुरुवातही मोठी राजदरबारशी संबंधित आहे. विविध धार्मिक कार्यक्रम तसेच परंपरा जपत गेली 134 वर्षे हा उत्सव सुरू असून यंदा त्यांची 135 वे वर्ष आहे.
कोल्हापूर संस्थानकडून जुना राजवाडा येथे मोठ्या प्रमाणावर दरबारचा गणेशोत्सव साजरा होत असे. या निमित्ताने 1890 साली संस्थानकडून 16 मानकर्यांना गणेशमूर्ती भेट देण्यात आल्या. त्यापैकी एक गणेशमूर्ती अंबाबाई मंदिरातील खजिन्यावरील मानकर्यांना देण्यात आली. तेव्हा हा गणपती अंबाबाईच्या मंदिरातील खजिन्यावर बसविण्यात आला. अंबाबाईचा गणपती म्हणून येणार्या भाविकांची गर्दी वाढली. त्यानंतर या गणपतीची गरूड मंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडपाच्या भव्यतेला साजेशी 5 फूट उंचीची शाडूची मूर्ती तयार करण्यात आली. तोच आकार व स्वरूप आजही कायम आहे.
पूर्वी गरूड मंडपात कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविले जात होते. दरवर्षी शहरातील मान्यवरांना बोलावून होणारा पान-सुपारीचा कार्यक्रम आजही साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी छत्रपती राजाराम महाराज उत्सवासाठी येत असल्याचे उल्लेख आहेत. तसेच संस्थानच्या वतीने मिरवणुकासाठी हत्ती घोडे व इतर लवाजमा मिळत असल्याचेही उल्लेख आहेत. अंबाबाईचा गणपती म्हणून या गणपतीला अर्पण होणारी नारळांची तोरणे यातून भाविकांची उपस्थिती लक्षात येते.
उत्सव काळात विद्युत रोषणाई, विविध व्याख्याने, भजनी मंडळाचे कार्यक्रम, गणेश याग , मंत्रपुष्पांजली असे विविध धार्मिक कार्यक्रम सादर केले जातात. परंपरेनुसार भाविक आगमन व विसर्जन मिरवणुकीत गणपती बाप्पांचा रथ ओढतात. गणेशमूर्ती शाडूची असून पर्यावरणाचे जतन करण्यासाठी मिरवणुकीने येऊन महालक्ष्मी भक्त मंडळासमोर उभारलेल्या विसर्जन कुंडात मूर्तीचे विसर्जन केले जाते. पारंपरिक ब्रास बँडच्या तालावर चालणारी मिरवणूक हे वेगळेपण आहे. पूर्वी मशालींच्या दिमाखात निघणार्या मिरवणुकीत फक्त आता कालानुरूप विद्युत रोषणाईचा बदल सोडला तर कोणताही बदल या उत्सवात झालेला नाही.