कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादनासाठी सोमवारपासून मिळकतींचे प्राथमिक सर्वेक्षण सुरू केले आहे.  
कोल्हापूर

Ambabai development plan | ‘अंबाबाई विकास आराखडा’ भूसंपादनासाठी प्राथ. सर्वेक्षण सुरू

एकूण 137 सिटी सर्व्हे क्रमांक; पहिल्या दिवशी 35 क्रमांक पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यांतर्गत करण्यात येणार्‍या भूसंपादनासाठी प्राथमिक सर्वेक्षणास सोमवारी सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण तीन पथकांमार्फत करण्यात येणार आहे. सर्वेक्षण प्रक्रियेला मिळकतधारकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राज्य शासनाने 1,445 कोटी 95 लाखांच्या अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला 6 मे 2025 रोजी मान्यता दिली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 143 कोटींच्या कामांना प्रारंभ झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात मंदिर परिसरातील कामांसाठी भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शी आणि गतीने व्हावी याकरिता परिसरातील मिळकतींचे मूल्यांकन करण्यासाठी ‘क्षेत्रीय तपासणी व मूल्यांकन समिती’ स्थापन केली आहे. या समितीने प्रस्तावित संपादित होणार्‍या जागेवरील मिळकतींचे प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.

प्रत्येक पथकात महापालिकेचे कनिष्ठ अभियंता पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यासह प्रत्येक पथकात एक ग्राम महसूल अधिकारी, एक परिरक्षण भूमापक तसेच घरफाळा विभागाचे दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये एकूण 137 सिटी सर्व्हे क्रमांक समाविष्ट आहेत. त्यापैकी आजच्या पहिल्याच दिवशी 35 सिटी सर्व्हे क्रमांकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, 7 सिटी सर्व्हे क्रमांकांचे काम अंशतः पूर्ण झाले आहे.

पथकांना सहकार्य करा

काही ठिकाणी मालकांऐवजी कुळ वास्तव्यास असल्याने संबंधित मिळकतधारकांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. या सर्वेक्षणातून संकलित होणार्‍या माहितीच्या आधारेच देवस्थान परिसर विकासाच्या पुढील टप्प्यांची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मिळकतधारकांनी सर्वेक्षणासाठी येणार्‍या पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT