कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या दक्षिण काशी कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी रविवारच्या सुट्टीची पर्वणी साधत भाविकांनी अलोट गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासून मुख्य दर्शनरांगेसह मुखदर्शनाची रांग भाविकांनी फुलून गेली. नवरात्राच्या सातव्या दिवशी रविवारी अंबाबाईचे षोडशी त्रिपुरसुंदरी अलंकार पूजारूप भाविकांनी डोळ्यात साठवून घेतले.
दर्शनासाठी सात दिवसांपासून गर्दीचा ओघ वाढतच आहे. नवरात्रकाळातील रविवारची सुट्टी सार्थकी लावत विविध राज्यातून पर्यटक, भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यामध्ये कर्नाटक, हैद्राबाद, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यासह महाराष्ट्रातून पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, नांदेड येथील भाविकांची संख्या लक्षणीय होती. सकाळी 9 वाजता रांग भवानी मंडपापर्यंत पोहोचली होती. अभिषेक करण्यासाठीही अनेक भाविक प्रतीक्षेत होते. शनिवारी पावसामुळे गर्दीचा ओघ काहीसा कमी होता; मात्र रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने दिवसभर मंदिर परिसर फुलून गेला.