सुनील सकटे
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील महत्त्वाच्या समजल्या जाणार्या आंबा घाटातील प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे या घाटात आपत्तीची आगाऊ सूचना मिळण्यासाठी हॅलो जिओ आणि हेल्लोमॅक जिओ ही अत्याधुनिक अलर्ट प्रणाली बसवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव कोल्हापूर कार्यालयाने दिल्ली मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला असून, लवकरच ही प्रणाली कार्यान्वित होईल, अशी माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
प्रवाशांना मिळणार तत्काळ संदेश
डिसेंबर 2025 मध्ये आणि रिलायन्स जिओ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार, ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. हॅलो जिओच्या माध्यमातून अपघातप्रवण क्षेत्र, दाट धुके, भटक्या जनावरांचा वावर किंवा वाहतुकीतील बदल यांबाबत प्रवाशांना रिअल टाईम सूचना मिळतील. विशेष म्हणजे, जिओ वापरकर्ते संबंधित परिसरात पोहोचताच त्यांच्या मोबाईलवर स्वयंचलितरीत्या एसएमएस, व्हॉटस्अॅप किंवा कॉल्सद्वारे सतर्कतेचा संदेश येईल. यासाठी प्रवाशांना कोणतेही स्वतंत्र अॅप डाऊनलोड करण्याची किंवा अतिरिक्त हार्डवेअरची गरज भासणार नाही.
अशी असेल हेल्लोमॅक यंत्रणा
आंबा घाटातील दरड कोसळण्याच्या धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्लोमॅक जिओ अलर्ट सिस्टीम हे स्मार्ट उपकरण वापरले जाणार आहे. तबकडीच्या आकाराचे हे उपकरण दरड प्रतिबंधक जाळ्या (ड्रेपरी सिस्टीम) आणि पायाभूत सुविधांवर बसवले जाईल. जमिनीची किंवा डोंगराची थोडी जरी हालचाल झाली, तरी त्याचे संकेत ही यंत्रणा तत्काळ देईल. उपग्रह (इरिडियम) आणि जीएसएम तंत्रज्ञानामुळे नेटवर्क नसलेल्या दुर्गम भागातही ही प्रणाली प्रभावीपणे काम करते.
सुरक्षेचे नवे कवच
ही यंत्रणा राजमार्ग यात्रा अॅप आणि 1033 या हेल्पलाईनशी जोडली जाणार आहे. यामुळे दरड कोसळण्यापूर्वीच इशारा मिळून संभाव्य जीवितहानी टाळता येईल. डिजिटल पायाभूत सुविधांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षितता वाढवण्यासाठी उचललेले हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे. आंबा घाटातील अवघड वळणे आणि पावसाळ्यातील दरडींचे सत्र पाहता या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा प्रवास निर्धोक होण्यास मोठी मदत होईल.