Kolhapur water supply | दिवाळीनंतर कोल्हापुरात दिवसाआड पाणीपुरवठा Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur water supply | दिवाळीनंतर कोल्हापुरात दिवसाआड पाणीपुरवठा

आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची माहिती; सध्या १० टक्के पाणी कपात

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : यंदा पाऊस कमी झाल्याने कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात केली जाणार आहे. शासनाच्या आदेशानुसार, शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. तर, दिवाळीनंतर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली.

शहराला दररोज सुमारे २१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा उपसा केला जात होता. हा उपसा सध्या १८० एमएलडीपर्यंत कमी केला आहे. तो आणखी कमी करून १५० एमएलडीपर्यंत होणार आहे. धरणांतील पाणीसाठ्याची दर दहा दिवसांनी माहिती घेतली जाणार आहे. उपलब्ध साठा, पाण्याची मागणी आणि आगामी काळातील संभाव्य गरज यांचा विचार करून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल. डिसेंबरमध्ये धरणांतील पाण्याची पातळी आणि शिल्लक साठ्याचा आढावा घेतल्यानंतर पुढील पाणीपुरवठ्याबाबत निर्णय होईल. त्यामुळे दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन उपलब्ध साठ्यानुसार पुढे बदलण्याची शक्यता राहणार आहे.

पाणी गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम

शहरात दररोज उपसा होणारे पाणी व प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचणारे पाणी यामध्ये तफावत आहे. जलवाहिन्यांमधील गळती, नळजोडण्यांमधील त्रुटी आणि पाणी चोरी ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. शहरात पाणी गळती शोधून ती दुरुस्त करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी घरगुती वापरात पाण्याची बचत करावी आणि पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

नियमभंग केल्यास १० हजारांपर्यंत दंड

पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. पाणी चोरी करणारे तसेच नळाला तोटी न बसविणाऱ्यांवर कारवाई करून संबंधित प्रकरणांत १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. पाणी गळती आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठीही प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

अर्ध्या तासापासून दोन तासांची कपात करावी

सध्या कोल्हापूर शहरात दोन तासांपासून ते आठ तासांपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये अर्ध्या तासापासून ते दोन तासांपर्यंतचा पुरवठा कमी केला जाणार आहे. जेथे दोन तास पाणीपुरवठा होतो. तेथे तो २० ते ३० मिनिटांनी कमी होईल आणि जेथे आठ तास पाणीपुरवठा होतो, तेथे तो दोन ते तीन तासांनी कपात केला जाईल. संपूर्ण शहरात समान पाणीवाटपाबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT