Almatti Water Level | अलमट्टीची पातळी वाढली; थबकले नद्यांचे प्रवाह! 
कोल्हापूर

Almatti Water Level | अलमट्टीची पातळी वाढली; थबकले नद्यांचे प्रवाह!

हिप्परगी - अलमट्टीतून तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता; सर्व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पावासाचा जोर कायम

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : कर्नाटकने यंदाही नेहमीप्रमाणे आपली हटवादी भूमिका कायम ठेवून अलमट्टी धरणात प्रमाणापेक्षा जादा पाणीसाठा केला आहे. परिणामी कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्यांचे प्रवाह मंदावून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे हिप्परगी-अलमट्टीतून तातडीने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्याची गरज आहे, अन्यथा सांगली - कोल्हापूरला महापुराचा धोका संभवतो.

अलमट्टीत अतिरिक्त पाणीसाठा!

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या समन्वयातून ठरल्यानुसार ऑगस्टअखेरपर्यंत अलमट्टीतील पाण्याची पातळी ५१७.५० मीटरच्या वर जाऊ द्यायची नाही. पण मंगळवार, दि. २१ रोजी रात्रीच अलमट्टीतील पाणीपातळी ५१८.२५ मीटरला जाऊन भिडली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी ही पातळी ५१७.९६ मीटरवर होती. सध्या १०१.३७ टीमसी पाणीसाठा झाला असून धरण भरायला केवळ २१ टीएमसी पाणी कमी आहे.

आवक जादा, जावक कमी!

सध्या अलमट्टी धरणात प्रतिसेकंद ६३ हजार ७९२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे, म्हणजे दिवसाकाठी अलमट्टी धरणात ५.६४ टीएमसी पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे येत्या केवळ दोन-तीन दिवसांतच हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. एकीकडे अलमट्टीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असताना विसर्ग मात्र केवळ ४२,५०० क्युसेकने सुरू आहे, म्हणजे आवक ५.६४ टीएमसी आणि विसर्ग मात्र अवघा ३.७६ टीएमसीने सुरू आहे. त्यामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढून अलमट्टीचे बॅकवॉटर मागे सरकू लागले आहे. हिप्परगी धरणाचेही सगळे दरवाजे अजून उघडण्यात आलेले नाहीत. कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आदेशाचा हा परिणाम आहे. सगळ्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांवर महापुराची छाया दाटू लागली आहे.

धरणे भरण्याच्या मार्गावर!

कृष्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे राधानगरी आणि चांदोलीसह अन्य धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. हवामान विभागाने आगामी तीन-चार दिवसांत या भागात मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या पाण्याला पुढे सरकायला वाव मिळणे आवश्यक आहे.

हिप्परगी - अलमट्टी!

कर्नाटकच्या हिप्परगी धरणात सध्या ३ टीएमसी पाणी आहे. राजापुरातूनच दररोज ४ ते ४.२५ टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे हिप्परगी एका दिवसात भरू शकते. ही बाब विचारात घेऊन हिप्परगी धरणाचे सर्व दरवाजे खुले करण्याची आवश्यकता आहे. अलमट्टी धरणही पूर्ण क्षमतेने भरायला केवळ २१ टीएमसी पाणी लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचा आगामी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला प्रचंड पाऊस, इथल्या धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्ग या बाबी पाहून हिप्परगी आणि अलमट्टीतून विसर्ग वाढविण्याची गरज आहे, अन्यथा नेहमीप्रमाणे महापुराला आमंत्रण आहेच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT