अलमट्टी धरण 
कोल्हापूर

‘अलमट्टी’ची आपत्ती रोखण्याची आता शेवटची संधी

दिल्लीत लवकरच ‘अलमट्टी’च्या उंचीबाबत बैठक; कर्नाटकला रोखण्याचे राज्यापुढे आव्हान

पुढारी वृत्तसेवा
सुनील कदम

कोल्हापूर : आजपर्यंत राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे राज्याच्या हक्काचे पाणी आंध्र-कर्नाटकने पळविलेच आहे. आता किमान त्याच पाण्यामुळे कोल्हापूर-सांगलीवर ओढवलेली अलमट्टीची आपत्ती तरी राज्यकर्त्यांनी रोखण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हा भाग कायमस्वरूपी महापुरात लोटण्याचा धोका आहे.

कर्नाटकची चिकाटी

कर्नाटकच्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत कृष्णा खोर्‍यातील जास्तीत जास्त पाणी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या आहेत. अलमट्टी धरणाला 1963 मध्ये मंजुरी मिळाली त्यावेळी या धरणाची निर्धारित उंची ही 517 मीटर इतकीच होती; पण त्यानंतर केंद्रीय जल आयोग, केंद्रीय जलमंत्री आणि दोन्ही लवादांना वेगवेगळी कारणे देत कर्नाटकने या धरणाची उंची आधी 505 मीटर, नंतर 512 मीटर आणि शेवटी 519 मीटरपर्यंत वाढवत नेलेली आहे. आता कर्नाटकने या धरणाची उंची 524 मीटर करण्याचा घाट घातला आहे.

तीन राज्यांचा विरोध

अलमट्टीच्या वाढत्या उंचीला आधी आंध्र प्रदेशने हरकत घेऊन लवादाकडे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात तशी याचिकाही दाखल केली आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशातून विभक्त झालेल्या तेलंगणानेही कृष्णेच्या पाण्यावर आपलाही स्वतंत्र हक्क असल्याचा दावा करून अलमट्टीच्या उंचीला विरोध केला आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी याबाबतीत गेल्या वीस-पंचवीस वर्षांत काहीही केलेले नव्हते. ही बाब संसदेतील चर्चेत स्पष्ट झाल्यानंतर आणि त्याबाबत टीकेची झोड उठल्यानंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रानेही याबाबतीत केंद्र शासनाकडे आणि लवादाकडे आपली हरकत नोंदविलेली आहे, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

आज दिल्ल्लीत बैठक

अलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारने मागील दोन वर्षांपासून निकराचे प्रयत्न चालविलेले आहेत. एवढेच नव्हे, तर कर्नाटकने त्यासाठी लागणार्‍या जमिनीचे अधिग्रहणही करून ठेवले आहे. यावरून या बाबतीतील त्यांची सिद्धता लक्षात यायला हरकत नाही. कर्नाटकच्या मागणीवरूनच केंद्रीय जलमंत्री सी. आर. पाटील हे याबाबत तीन राज्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन लवकरच करणार आहेत. साहजिकच या बैठकीत कर्नाटक अलमट्टीची उंची वाढविण्यासाठी निकराचे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी त्यांनी बर्‍याच दिवसांपासून तयारी केल्याचे दिसत आहे. कर्नाटकच्या या दुराग्रहाला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन राज्ये हरकत घेतल्याशिवाय राहणार नाहीत; पण महाराष्ट्रानेही जोरदार विरोध करण्याची गरज आहे.

...अन्यथा कायमचा महापूर

अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांवर महापुराचे संकट ओढवते, हे आजपर्यंत चारवेळा सिद्ध झाले आहे, शिवाय अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517 मीटरच्या खाली गेल्याशिवाय इथला महापूर ओसरत नाही, हेसुद्धा निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढल्यास सांगली-कोल्हापूर या दोन शहरांसह कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीकाठावरील शेकडो गावांना जलबुडीचा धोका अटळ आहे. निम्मे कोल्हापूर, सगळी सांगली आणि नदीकाठची शेकडो गावे स्थलांतरित करावी लागणार आहेत. ही बाब विचारात घेता महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी अलमट्टीमुळे येणारी आपत्ती रोखण्याची ही शेवटची संधी समजून अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला निकराने विरोध करण्याची आवश्यकता आहे.

उंची वाढल्यास कोल्हापुरातील या भागात असेल इतके पाणी

2005, 2019 आणि 2021 मध्ये पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी राजाराम बंधार्‍याजवळ सर्वोच्च पाणी पातळी 56.3 फूट इतकी होती. अलमट्टीची उंची वाढल्यावर महापूर आल्यास ही पाणी पातळी किमान 71 फूट होईल. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराच्या कोणत्या भागात किती फूट पाणी असेल, त्याची ही झलक...

जिल्हाधिकारी कार्यालय व परिसर 18 ते 19 फूट

बसंत-बहार टॉकीज ते जिल्हाधिकारी कार्यालय पूर्व भाग 21 ते 22 फूट

कोल्हापूर कमान ते टोल नाका रस्त्यावर 22 ते 23 फूट

महाराणा प्रताप हायस्कूल ते दुधाळी ग्राऊंड 22 ते 23 फूट

मुक्त सैनिक वसाहत ते कदमवाडी गणेश पार्क 23 ते 24 फूट

पंचगंगा तालीम ते व्हिनस कॉर्नर रस्ता परिसर 24 ते 25 फूट

महावीर कॉलेज, सनसिटी ते ड्रीम पार्क परिसर 25 ते 26 फूट

मेडिकल कॉलेज बावडा ते जयंती नाला परिसर 25 ते 26 फूट

रिलायन्स मॉल, कुंभार गल्ली ते कोंडा ओळ 27 ते 28 फूट

सुतारवाडा ते जुना शिये नाका परिसर 29 ते 31 फूट

उंची वाढल्यास सांगलीतील या भागात असेल इतके पाणी

2005, 2019 आणि 2021 मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या वेळी सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सर्वोच्च पाणी पातळी 57.6 फूट इतकी होती. अलमट्टीची उंची वाढल्यावर महापूर आल्यास ही पाणी पातळी किमान 72 फूट होईल. त्या पार्श्वभूमीवर सांगली शहराच्या कोणत्या भागात किती फूट पाणी असेल, त्याची ही झलक...

कॉलेज कॉर्नर व आजूबाजूचा परिसर 18 ते 19 फूट

गोकुळनगर ते मध्यवर्ती बसस्थानक 23 ते 24 फूट

गुजराती हायस्कूल ते ईदगाह मैदान 28 ते 29 फूट

सांगलीवाडी, टिळक चौक, शामरावनगर 30 ते 31 फूट

रामनगर, आमराई, व्यंकटेशनगर 31 ते 32 फूट

हरिपूर रोड, पाटणे प्लॉट, भारनगर 32 ते 33 फूट

मारुती चौक आणि गावभाग परिसर 32 ते 33 फूट

सिद्धार्थनगर, राजीव गांधीनगर परिसर 33 ते 34 फूट

दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी 40 ते 41 फूट

कर्नाळ रोड, सूर्यवंशी प्लॉट परिसर 41 ते 43 फूट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT