कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील नदीकाठावरील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील महापुराला कारणीभूत ठरणार्या अलमट्टी धरणाची पाणी पातळी महापुराच्या सीमारेषेवर म्हणजे 517 मीटरवर गेली आहे. यापुढे पाणी पातळी गेली की, या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण होतो. यामुळे आगामी दीड महिना म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत ही पातळी 517.50 मीटरपर्यंत नियंत्रितच ठेवावी लागणार.
अलमट्टी धरणातील पाणी पातळी 15 ऑगस्टपर्यंत 517.50 मीटरपर्यंत नियंत्रित ठेवावी, असा निर्णय यावर्षीही आंतरराज्यीय बैठकीत झाला आहे. या निर्णयाचे पालन व्हावे, याकरिता दोन्ही राज्यांत समन्वयही साधला जातो. राज्याच्या जलसंपदा विभागाने यावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकार्यांचीही नियुक्ती केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एरवी जुलैच्या दुसर्या-तिसर्या आठवड्यानंतर 517 मीटरपर्यंत जाणारी अलमट्टीची पाणी पातळी यावर्षी जून महिन्यातच 517 मीटरवर गेली आहे. सोमवारी, 30 जून रोजी सकाळी सात वाजता ही पाणी पातळी 517.03 मीटरवर गेली असून, धरणात 84.82 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
अलमट्टी धरणाची 2 जून रोजी 513.74 मीटर इतकी पाणी पातळी होती. यावेळी धरणातील पाणीसाठा 52.71 टीएमसी होता. यावेळी धरणात 17 हजार 309 क्युसेक पाणी येत होते, तर धरणातून केवळ 5 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्याने अलमट्टी धरणातील पाण्याची आवकही वाढत गेली. त्यामुळे धरणातून विसर्गही वाढवण्यात आला.
गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत पावसाचे प्रमाण वाढले आहे. कमी कालावधीत जादा पाऊस पडल्याने आणि धरणातील पाणीसाठा यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात 2019 व 2021 या वर्षांत भीषण महापुराला तोंड द्यावे लागले होते. यामुळे जुलै महिन्यात जिल्ह्यातील धरणात आणि अलमट्टीतही मर्यादित पाणीसाठा आवश्यक असतो. मात्र, यावर्षी हे चित्र वेगळे आहे. जिल्ह्यातील धरणात आणि अलमट्टीतही दमदार पाणीसाठा झाल्यामुळे जुलै महिन्यात होणार्या पावसाकडे लक्ष आहे. या पावसाचीच भीती आहे.