कोल्हापूर : अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत केंद्रीय जलशक्तिमंत्री सी. आर. पाटील यांनी गुरुवारी (दि. 22) नवी दिल्लीत विशेष बैठक बोलावली आहे. संसद भवनातील समिती कक्षात सकाळी साडेअकरा वाजता ही बैठक होणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील महापुराला कारणीभूत ठरणार्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटकने घातला आहे. मात्र, अलमट्टीची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनाने विरोध केला असून, कर्नाटकला परवानगी देऊ नये, अशी ठाम भूमिकाही घेतली आहे.
अलमट्टी धरणाच्या सध्या असलेल्या उंचीमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा सामना करावा लागतो. यामुळे या धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव आणि पावसाळ्यात धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग या मुद्द्यावर आवाज उठवला होता. याबाबत बैठक घेण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत ही बैठक आयोजित केली असून, त्याला आपल्याला निमंत्रित केल्याचे माने यांनी सांगितले.