Almatti dam height increase | लाखो कोटींच्या जमिनी-मालमत्तांवर फिरेल ‘अलमट्टी’चे पाणी! Pudhari File Photo
कोल्हापूर

Almatti dam height increase | लाखो कोटींच्या जमिनी-मालमत्तांवर फिरेल ‘अलमट्टी’चे पाणी!

लाखो एकर शेती जाईल कायमची पाण्याखाली; नदीकाठच्या गावांवर विस्थापित होण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेती कायमस्वरूपी अलमट्टीच्या बॅकवॉटरमध्ये बुडून जाण्याचा धोका आहे. शिवाय नदीकाठच्या शेकडो गावांमधील लाखो लोकांवर विस्थापित होऊन पुनर्वसनासाठी भटकण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय यामुळे होणारे नुकसान काही लाख कोटी रुपयांमध्ये असेल.

अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 519 मीटरवर गेली की, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापूर ओढवतो, हे आजपर्यंत एकदा नव्हे तर तीन-तीन वेळा सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे अलमट्टीतून अडीच-तीन लाख क्युसेकने विसर्ग करून धरणातील पाण्याची पातळी 517 मीटरच्या खाली नेल्याशिवाय इथला महापूर ओसरत नाही, ही बाबसुद्धा तीन महापुराच्या वेळी स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनाकडे ऑगस्टपूर्वी धरणातील पातळी 517 मीटरपेक्षा जादा वाढवू नये असा आग्रह धरला आणि कर्नाटकनेही तो मान्य केला. असे असताना आणि इथल्या महापुराला अलमट्टीचे बॅकवॉटरच कारणीभूत ठरत असूनही कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा अलमट्टीची उंची वाढविण्याचा घाट घातला आहे.

भयावह परिणाम शक्य! पुनर्वसन कुठे आणि कसे?

अलमट्टीची उंची वाढली की पंचगंगा, कृष्णा, वारणा काठावरील शेकडो गावे पाण्याखाली जाऊन या गावांच्या पुनर्वसनाचा भयावह प्रश्न निर्माण होणार आहे. महाराष्ट्र शासनाला अजून कोयना आणि चांदोली धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन शक्य झालेले नाही. अशा परिस्थितीत या नव्या विस्थांपितांचे पुनर्वसन कसे-कुठे करायचे आणि त्यासाठी लागणार्‍या हजारो-लाखो कोटी रुपयांची सोय कशी करायची, असा गहन सवाल महाराष्ट्र शासनापुढे उभा ठाकण्याची शक्यता आहे.

2019 च्या महापुरात कोल्हापूर जिल्ह्याची हानी

पूरबाधित तालुके : सर्व 12 तालुके

पूरबाधित कुटुंबे : 1,02,743

पूरबाधित घरे : 41,34

घरांचे नुकसान : 554 कोटी 65 लाख

सिंचन प्रकल्पांचे नुकसान : 278 कोटी

पूरबाधित रस्ते : 5613 कि.मी.

पूरबाधित छोटे-मोठे पूल : 98

दुरुस्ती खर्च : 3290 कोटी

महावितरणचे नुकसान : 983 कोटी

पूरबाधित शेती : 88,439 हेक्टर

शेतीचे नुकसान : 1,489 कोटी

एकूण नुकसान : 6,596 कोटी रुपये

2019 च्या महापुरात सांगली जिल्ह्याची हानी

पूरबाधित तालुके : प्रामुख्याने 6 तालुके

पूरबाधित कुटुंबे : 34,917

पूरबाधित घरे : 21,797

घरांचे नुकसान : 334 कोटी 42 लाख

सिंचन प्रकल्पांचे नुकसान : 300 कोटी

पूरबाधित रस्ते : 1,883 कि.मी.

पूरबाधित छोटे-मोठे पूल : 39

दुरुस्ती खर्च : 2000 हजार कोटी

महावितरणचे नुकसान : 500 कोटी

पूरबाधित शेती : 54,549 हेक्टर

शेतीचे नुकसान : 1000 कोटी

एकूण नुकसान : 4,143 कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT