सुनील कदम
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने कर्नाटकशी समन्वय राखून संयुक्त महापूर व्यवस्थापन केल्याने गेल्या चार वर्षांपासून सांगली आणि कोल्हापूरला भेडसावणारा महापूर थांबला होता; पण आता कर्नाटकने या महापुराला पुन्हा एकदा आमंत्रण देण्याचा घाट घातलेला दिसत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाने प्रचंड विरोध करूनही कर्नाटकने अलमट्टीची उंची वाढविण्याचा आपला हट्ट सोडलेला नाही. उंची वाढविण्यासाठी केंद्र शासनाने अद्याप परवानगी दिली नसली, तरी कर्नाटकचा त्यासाठी आटापिटा सुरूच आहे. पहिल्या टप्प्यात कर्नाटकने त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. आता चोरीछुपे उंची वाढविण्याचा घाट घातलेला दिसत आहे.
स्किन प्लेटचा वापर!
कर्नाटकने आता धरणाच्या गेटवर स्किन प्लेट बसविण्याची तयारी चालविलेली दिसत आहे. या स्किन प्लेटस् आवश्यक त्यावेळी तातडीने बसविता येतात आणि लगोलग काढताही येतात. यातून कर्नाटकचा असा डाव दिसतो आहे की धरणावर चोरीछुपे स्किन प्लेट बसवायच्या आणि 123 टीएमसीचा पाणीसाठा 186 टीएमसीपर्यंत वाढवायचा! महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी किंवा केंद्र शासनाने जर हरकत घेतलीच, तर कालापव्यय करीत जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत या स्किन प्लेटस् ठेवायच्या आणि नंतर काढून टाकायच्या. जानेवारीनंतर जरी प्लेटस् काढल्या, तरी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलेच राहणार आहे; पण कर्नाटकच्या या आगळीकीमुळे महापुराचा धोका वाढणार आहे.
‘अलमट्टी’ धरणावर प्लेटस् बसविल्यास होणारे परिणाम...
अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसीवरून थेट 186 टीएमसीपर्यंत वाढणार
अलमट्टीतील पाणीसाठा वाढेल तसा कोल्हापूर, सांगलीतील बॅकवॉटरचा प्रभाव आणखी वाढणार
कोल्हापूर, सांगलीतील महापुराची पातळी आणखी किमान चार ते पाच फुटाने वाढत जाणार
महाराष्ट्र-कर्नाटक संयुक्त महापूर व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजण्याचा फार मोठा धोका निर्माण होणार
राज्याने ‘या’ उपाययोजना करण्याची आवश्यकता...
कर्नाटकची आगळीक केंद्रीय जल आयोगाच्या निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता
संयुक्त महापूर व्यवस्थापन आणखी सूक्ष्म पातळीपर्यंत करण्यासाठी जलसंपदाला आदेश देण्याची गरज
कर्नाटक शासन जर आपला हेकेखोरपणा सोडणार नसेल, तर न्यायालयात आव्हान देण्याची आवश्यकता
जागतिक बँकेने मंजूर केलेल्या महापूर नियंत्रण उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज