सुनील कदम
कोल्हापूर : एकीकडे कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आटापिटा करीत आहे, तर दुसरीकडे राज्याच्या जलसंपदा विभागाच्या मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी याबाबतचा रूरकी समितीचा अहवालच दै. ‘पुढारी’च्या हवाली केला आहे. या अहवालानुसार जर अलमट्टी धरणाची उंची वाढली तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला अक्षरश: जलबुडीचा धोका निर्माण होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
समितीची स्थापना!
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराच्या कारणांचा सखोल तांत्रिक अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 एप्रिल 2022 रोजी उत्तराखंड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी, रूरकी या संस्थेला कळविले होते. त्यानुसार या संस्थेने डॉ. ए. के. लोहानी, डॉ. आर. व्ही. काळे आणि अभियंता जे. के. पात्रा या जलतज्ज्ञांचा एक अभ्यास गट महाराष्ट्रात पाठविला होता. या अभ्यास गटातील सदस्यांनी 1 जून ते 5 जून 2023 दरम्यान कराड-सांगली-कोल्हापूर ते अलमट्टीपर्यंतच्या कृष्णा-पंचगंगा नदीपात्राची पाहणी केली होती. तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे या समितीने काही प्राथमिक निष्कर्ष काढले होते.
524 मीटरचा अभ्यास!
रूरकी समितीने अलमट्टी धरणाची उंची 519 मीटर गृहीत धरून हा अभ्यास केला होता. मात्र कर्नाटक सरकारने सातत्याने अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याचा घाट घातलेला आहे. त्यामुळे जुलै 2024 मध्ये जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांनी रूरकी समितीच्या सदस्यांशी संपर्क साधून अलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढविल्यास काय परिणाम होतील, याचाही अभ्यास करून अंतिम अहवाल देण्याची सूचना केली होती. त्यानुसार रूरकी समितीने अलमट्टी धरणाच्या 524 मीटर उंचीचे हायड्रॉलिक मॉडेल तयार करून त्याचाही अभ्यास केला आहे. त्यानुसार समितीने अंतिम अहवाल शासनाला सादर केला आहे. मात्र शासनाने हा अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही.
अहवाल दै. ‘पुढारी’च्या हाती!
तीन दिवसांपूर्वी कर्नाटकातील खासदारांनी दिल्लीत बैठक घेऊन अलमट्टीच्या उंचीवाढीसाठी केंद्र शासनाला साकडे घातले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या जलसंपदा मंत्रालयातील एका वरिष्ठांनी रूरकी समितीच्या अहवालाची प्रतच दै. ‘पुढारी’च्या हवाली केली. त्यामुळे या अहवालातील अनेक बाबी प्रकर्षाने पुढे येण्यास मदत झाली आहे.
अहवालातील निष्कर्ष!
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 1994 सालापासूनच्या पूर आणि महापूर परिस्थितीचा अभ्यास करून समितीने अनेक निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार अलमट्टी धरणाचे बांधकाम 519 मीटरने पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 2005 सालानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पूर परिस्थितीत 2.64 ते 3.23 मीटरने (8.66 ते 10.60 फूट) वाढ होते. तसेच अलमट्टीच्या बॅकवॉटरचा प्रभाव या भागात वाढत जातो. अलमट्टी धरण 519 मीटरने भरल्यास त्याचे बॅकवॉटर महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत पोहोचते. परिणामी सांगली-कोल्हापुरातील नद्यांचे पाणी तुंबून राहते. अलमट्टीचे बॅकवॉटर ओसरेपर्यंत इथल्या नद्यांचा फुगवटा कमी होत नाही. अलमट्टीची उंची 524 मीटरपर्यंत वाढविली तर अलमट्टीचे बॅकवॉटर थेट कोल्हापूर आणि सांगली शहरांमध्ये घुसेल. शिवाय अनेक दिवस तिथेच तुंबून राहिल. परिणामी महापुराचा व्याप्ती कित्येक पटींनी वाढून अनेक गावे व शेतीवाडी बुडून जाण्याचा धोका निर्माण होईल, असे निष्कर्ष समितीने नोंदविले आहेत.
अनेक घटकांचा अभ्यास!
रूरकी समितीने आपला अहवाल तयार करताना अनेक घटकांचा सखोल अभ्यास केला आहे. अलमट्टीची उंची 519 मीटर असताना आणि ती 524 मीटरपर्यंत वाढलेली, अशी दोन प्रकारची हायड्रॉलिक मॉडेल तयार करून अभ्यास करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कराडपासून अलमट्टीपर्यंत कृष्णा नदीसह येरळा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा या नद्यांचा प्रवाह आणि त्यावर होणारा अलमट्टीच्या बॅकवाटरचा प्रभाव याचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय अलमट्टी आणि हिप्परगी धरण, कोल्हापूर पद्धतीचे 14 बंधारे, नदीवरील 14 पूल आणि तब्बल 494 क्रॉस सेक्शन तपासण्यात आले आहेत.
पुन्हा शिक्कामोर्तब!
या सगळ्या बाबी विचारात घेता हा अहवाल अत्यंत अभ्यासपूर्ण असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत वारंवार निर्माण होणाऱ्या महापुराला अलमट्टीचे बॅकवॉटरच कारणीभूत होते, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता तरी अलमट्टीच्या उंचीवाढीला ठाम विरोध करण्याची गरज आहे.