कोल्हापूर : जून संपण्यापूर्वीच अलमट्टी धरण मंगळवारी सकाळी आठ वाजता 62 टक्क्यांहून अधिक भरले. धरणात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 76.586 टीएमसी पाणीसाठा झाला होता. यामुळे धरणाची पाणी पातळी 516.33 मीटरवर पोहोचली आहे. धरणात सध्या 83 हजार 423 क्यूसेक पाणी येत असून 70 हजार क्यूसेक पाणी धरणातून पुढे सोडले जात आहे.
अलमट्टी धरणातील पाणी पातळीवरच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराची स्थिती अवलंबून असते. यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यानुसार दि. 15 ऑगस्टपर्यंत धरणाची पाणी पातळी 517.50 मीटरपर्यंत ठेवण्याचा निर्णय आतंरराज्य बैठकीत झाला आहे.पाणी पातळी नियंत्रणाचा निर्णय झाला असला, तरी अलमट्टी धरणातील वाढत्या पाणीसाठ्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आतापासूनच धडकी भरू लागली आहे. जून महिन्यातच धरण तब्बल 62 टक्क्यांहून अधिक भरले आहे. अलमट्टीच्या अगोदर असणारे कर्नाटकातीलच हिप्परगी बॅरेजमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. या धरणात 77 हजार 451 क्यूसेक पाणी येत असून 76 हजार 701 क्यूसेक पाण्याचा विसर्ग पुढे अलमट्टीला जात आहे.
पंचगंगेवरील राजाराम बंधार्याहून 27 हजार 925 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अखेरचा बंधारा असलेल्या राजापूर बंधार्यावरून 58 हजार 667 क्यूसेक पाणी पुढे कर्नाटकात जात आहे. पाण्याचा हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असून त्याद़ृष्टीने हिप्परगी आणि अलमट्टीतही पाण्याची आवक वाढणार आहे. यामुळे या धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्याची आवश्यकता आहे.