कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे; मात्र शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काहीही झाले, तरी शिवसेनेचा पहिला महापौर करण्याच्या तयारीने बेरजेचे राजकारण करत हा पक्ष निवडणूक रिंगणात उतरला आहे.
भाजप सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले सत्यजित कदम, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख आणि माजी आमदार सुरेश साळोखे यांचा पक्षप्रवेश शिंदे गटासाठी मोठा बूस्टर ठरणार आहे. या हालचालींमुळे महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून मनी सर्व पॉवर वापर होण्याची शक्यता आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असलेले आमदार राजेश क्षीरसागर यांनी मागील काही वर्षांपासून महापालिका निवडणुकीची व्यूहरचना आखलेली आहे. महापालिकेतील विशिष्ट प्रभागांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्याचे राजकीय फळ मिळू शकते, असे कार्यकर्त्यांना वाटते. अनेक प्रभागात त्यांनी निधी देऊन स्थानिक शिवसैनिकाला बूस्टर दिला आहे. त्यामुळे हे शिवसैनिक नगरसेवक होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पूर्व भागात विशेषतः कावळा नाका ते तावडे हॉटेल या पट्ट्यात सत्यजित कदम यांचा संपर्क मोठा आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे या भागातील शिंदे गटाची ताकद वाढली आहे. तसेच काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला असून, त्यांच्या सोबत डझनभर माजी नगरसेवक पक्षात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील काही प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी आमदार सुरेश साळोखे यांच्या संभाव्य प्रवेशाची चर्चा आहे. या सर्व हालचाली कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पक्षाची मजबूत पकड निर्माण करत आहेत.
2015 ते 2020 च्या महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेला केवळ चार नगरसेवक मिळाले होते. मात्र, यावेळी शिवसेनेचा पहिला महापौर व्हावा, यासाठी शिंदे गट सक्रिय झाला आहे. पूर्वीच्या अपयशाचा अभ्यास करत नव्या रणनीतीसह बेरजेचे राजकारण सुरू केले असून, नव्या जोडण्यांद्वारे ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.