कसबा बावडा : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील यांची निवड निश्चित मानली जात होती. त्या द़ृष्टीने चुये या त्यांच्या गावी मंडप उभारला. मिरवणुकीची तयारीही झाली. सायंकाळी भेटायला येणार्या नागरिकांना जेवणाचा बेतही आखला. मात्र अन्य संचालकाची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चाहूल लागली आणि गावात शांतता पसरली. सकाळीच मंडप काढण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी शशिकांत पाटील यांचे नाव अध्यक्षपदी निश्चित करण्यात आले होते, पण यामध्ये ट्विस्ट आला, गुरुवारी सायंकाळी जिल्हा बँकेत ‘गोकुळ’चे संचालक आणि सत्तारूढ आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. अध्यक्षपदाबाबत मुंबईतही खलबते झाली. नाट्यमय घडामोडीनंतर नविद मुश्रीफ यांची निवड झाली.
गोकुळचे संस्थापक चेअरमन आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांची दोन दिवसांपूर्वी अध्यक्ष म्हणून निवड निश्चित मानली जात होती. यामुळे चुये या त्यांच्या गावी जोरदार तयारी केली होती. डिजिटल फलकांचे डिझाईनही तयार होते. फटाके, गुलाल यांची ऑर्डर दिली होती. मात्र गुरुवारी सकाळीच अध्यक्षपदी अन्य कोणाची तरी वर्णी लागणार याचा अंदाज आल्याने मंडप हटवण्यात आला. जेवणासह इतर गोष्टींनाही बगल देण्यात आली. पक्षीय राजकारणासह कोणाचा तरी करेक्ट कार्यक्रम करायचा, या हेतूने शशिकांत पाटील यांची निवड न झाल्यामुळे चुये गावात दिवसभर नाराजी व्यक्त होत होती.