कोल्हापूर : ओबीसीप्रमाणे नव्हे, तर ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करा, जिल्ह्यात कोल्हापूर गॅझेटियर लागू करा, अशी मागणी करत सोमवारी सर्वपक्षीय कोल्हापूर गॅझेटियर अंमलबजावणी समितीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना निवेदन दिले.
ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, मराठा समाज कोणत्याही जातीच्या विरोधात नाही. हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीचा आधार घेऊन मराठ्यांना कुणबी दाखला देण्यासाठी समिती गठित केली; पण शासनाला १८८६ चे कोल्हापूर गॅझेट का दिसत नाही? शासकीय पुस्तकात गॅझेटियरच्या नोंदी आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळाले पाहिजे. १८८१ मध्ये कुणबी लोकसंख्या २ लाख ९९ हजार ८७१ नोंदविली आहे. कोल्हापुरात तेव्हा एकूण लोकसंख्या ७ लाख १९ हजार १६४ होती. यात ६३ टक्के कुणबी होते. तर, मराठा ६२ हजार ७८७ म्हणजेच ८ टक्के होते. २०२६ च्या लोकसंख्येच्या आधारे जिल्ह्यात कुणबीची संख्या ४ लाख ५३ हजार असली पाहिजे; पण २९ मे २०२६ रोजी फक्त १ लाख ४० हजार ५३१ कुणबी आहेत. कोल्हापूर गॅझेटियरशी नोंद मिळतीजुळती नाही. म्हणून १८८१ चे कोल्हापूर गॅझेटियरमध्ये जातनिहाय नोंद करताना जो सर्व्हे झाला, ती कागदपत्रे शासनाने जाहीर करावीत. विजय देवणे म्हणाले, जिल्हास्तरावर कोल्हापूर गॅझेटियर ग्राह्य धरा, प्रलंबित कुणबी दाखले त्वरित द्या. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, कुणबी मराठा एकच आहेत, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरसकट कुणबी दाखले द्या. दिलीप देसाई म्हणाले, कुणबी दाखले दिले जातात; पण त्यांची व्हॅलिडिटी होत नाही. त्यामुळे ती समिती बरखास्त करा. त्यांचे अधिकार प्रांत आणि तहसीलदारांना द्या. कुलवाडी, कुळवाडी पोटजाती एकच आहेत. यावेळी संजय पवार, हर्षल सुर्वे, सुभाष जाधव, राजू लिंग्रस, अनिल कदम, राजू यादव, अवधूत साळोखे, सागर धनवडे, अविनाश दिंडे, तानाजी भोसले, सरिता सासणे, वैशाली महाडिक, ॲड. सतीश नलवडे, अशोक भंडारी व समाज बांधव उपस्थित होते.
सर्वच मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या
मुख्य प्रवाहात मराठा समाजाला आणण्यासाठी जिल्ह्यातील इच्छा असेल त्या सर्वच मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या, इतर मागासवर्गाच्या महाराष्ट्राच्या सूचीमध्ये समाविष्ट करा, अशी मागणी कोल्हापूर गॅझेटियर अंमलबजावणी समितीने केली.