कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला जोरदार विरोध करताना आठ गावेच काय, एका गावातील एक घरसुद्धा महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वज्रमूठ बैठकीत गुरुवारी करण्यात आला. हद्दवाढ लादल्यास महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला. पॅव्हेलियन हॉटेलमध्ये बैठक झाली. अध्यक्षस्थानी उचगावचे सरपंच व कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण होते.
मधुकर चव्हाण म्हणाले, शहराचे आ. राजेश क्षीरसागर हद्दवाढीसाठी हट्ट धरत आहेत. ते तीनवेळा आमदार होते; त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणता ठोस विकास केला, हे सांगावे. शहराच्या अपयशी कारभाराची किंमत आम्ही का भोगावी?
उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे म्हणाले, हद्दवाढीत समावेश होणार्या गावांचे प्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात न घेता एका आमदाराच्या आग्रहाखातर हा प्रस्ताव पुढे रेटला जात आहे.
मुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील म्हणाले, हद्दवाढीमागे ‘फोडा, तोडा आणि जोडा’ ही कुटील नीती कार्यरत आहे. यामागे मोठा राजकीय डाव आहे.
किरण आडसूळ यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस राखी भवड, प्रियांका पाटील, अमृता पोवार, रूपाली कुसाळे, शुभांगी आडसूळ, विमल शिंदे, सुमन गुरव, ए. व्ही. कांबळे, संदीप पाटोळे, शिवसेनेचे राजू यादव यांच्यासह 20 गावांचे सरपंच, उपसरपंच व विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुडशिंगीच्या महापालिकेला स्वमालकीची इमारत नाहीसरपंच अश्विनी शिरगावे म्हणाल्या, महापालिकेची स्वमालकीची चांगली इमारत नाही. एखादी समिती आली, तर स्वच्छतागृहे झाकून ठेवावी लागतात. याउलट ग्रामपंचायतीच्या इमारती आणि सुविधा चांगल्या आहेत.
महापालिकेला केवळ 500 मीटर हाफ राऊंड गटारीसाठीही निधी नाही. मग ग्रामीण भागाचा विकास ते काय करणार, असा सवाल उजळाईवाडीच्या उपसरपंच भाग्यश्री पारखे यांनी केला.