कोल्हापूर : सीपीआरसह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी अॅडव्हान्स निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत सीपीआरची कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ यांच्या हस्ते विविध सेवा-सुविधांचा लोकार्पण सोहळा रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते.
कामे दर्जेदार करा. संघटनांची तक्रार असेल, तर त्यांनी मला सांगावे. त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. दोन वर्षांत रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट होईल, असेही ते म्हणाले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सीपीआरची सुरुवातीला स्थिती बिकट होती. त्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला. कामाचा चौथा टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात भोगावती इमारतीमध्ये 40 बेडचा नवजात अर्भकांचा अतिदक्षता विभाग तयार केला आहे. यामध्ये व्हेंटिलेटर, मल्टिपॅरा मॉनिटर, रेडिएंट वॉर्मर, फोटो थेरपी, सेंट्रल ऑक्सिजन, सेंट्रल सक्शन सुविधा आहेत. कुंभी इमारतीच्या टेरेसवर चार विभागप्रमुख व त्यांची कार्यालये केली आहेत. येथे सुसज्ज व अद्ययावत ऑपरेशन थिएटर, सेमिनार हॉल, ऑर्थोपेडिक, त्वचारोग, स्त्री रोग विभाग या ओपीडींचा समावेश आहे.
डॉ. मोरे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी मला येथे अधिष्ठातापद घेण्यासाठी आग्रह केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमडी, एमएसचा अभ्यासक्रम सुरू केला. कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी कामांची माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कांबळे, ठेकेदार विश्वंभर शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते निवृत्तीनिमित्त अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, अनिकेत जाधव-कसबेकर, तेजस खोत, सोमनाथ खोत, डॉ. संगीता कुंभोजकर डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. अनिता सैबन्नावार, डॉ. अनीता परितेकर, डॉ. अक्षय बाफना, डॉ. सुनीता रामानंद, डॉ. बुद्धिराज पाटील, डॉ. श्वेनिल शहा, डॉ. राहुल जाधव, बंटी सावंत उपस्थित होते. डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी आभार मानले.
कृष्णा इमारतीमध्ये ओपीडी, एक्सरेसह रक्त, लघवी, थुंकी तपासणीची सुविधा आहे. भाजलेल्या रुग्णांचा विभागाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. असे एकूण पाच विभागांचे लोकार्पण केल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. भविष्यात पीपीपी तत्त्वावर शासकीय दरात सोयी-सुविधा रुग्णांना देण्याचा संकल्प आहे. पुणे, मुंबईला उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.