अनुराधा कदम
कोल्हापूर : कुणी विश्वास ठेवा अगर ठेवू नका; पण हे खरे आहे. वेगवेगळ्या माध्यमातून माणसाच्या पोटात आठवड्याला पाच ग््रॉम म्हणजेच एका क्रेडिट कार्डच्या वजनाएवढे प्लास्टिक जात आहे. यामुळे वाढणारे विविध आजार ही माणसाच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू कास्टल विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या संशोधन अहवालातून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा धोका आता पर्यावरणापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो थेट मानवी शरीरात पोहोचत असल्याचे वास्तव आहे. पाणी, अन्नघटक व हवेतून प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचा शरीरात शिरकाव वाढला असून, रक्त, फुफ्फुस व गर्भाशयापर्यंत हा धोका पोहोचल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
संशोधन काय सांगते?
80 टक्क्यांहून अधिक लोकांच्या शरीरात सूक्ष्म प्लास्टिक कण
बाटली बंद पाण्यात प्लास्टिक कणांचे प्रमाण दहापट जास्त
हवा, पाणी आणि अन्नसाखळीमधून मायक्रोप्लास्टिकचा शिरकाव
रक्त, फुफ्फुस आणि प्लेसेंटा (गर्भातील भाग) पर्यंत धोका
कॅन्सरच्या शक्यता वाढीचे प्रमुख कारण
प्लास्टिक कण शरीरात साठून दीर्घकालीन आजारांसाठी कारणीभूत
कारणे काय?
सिंगल यूज प्लास्टिकचा वाढता वापर
प्लास्टिक कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन
सिंथेटिक कपडे, कॉन्टॅक्ट लेन्स, वाहनांचे टायर यातून निघणारे सूक्ष्म कण
प्रदूषित हवेच्या सान्निध्यातील वाढता वावर
बाटली बंद पाणी पिण्याची सवय.
मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय?
हवा, पाणी आणि अन्नसाखळीतील पाच मि.मी.पेक्षा लहान प्लास्टिकचे कण, ज्यांची सूक्ष्मता डोळ्यांना न दिसण्याइतकी असते.