कोल्हापूर : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुशांत शेलार आणि धनाजी यमकर यांनी सोमवारी (दि. २५) घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी विजय पाटकर यांच्या कार्यकाळातील आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करत त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ठेवण्याची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुशांत शेलार यांनी थेट आर्थिक गैरव्यवहारावर बोट ठेवले. ते म्हणाले की, "पाटकर यांच्या कार्यकाळात 'मानाचा मुजरा' हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वास्तविक पाहता, या कार्यक्रमाचा खर्च १४ लाख रुपये होणे अपेक्षित होते, परंतु पाटकर यांनी त्यासाठी तब्बल ५७ लाख रुपये खर्च केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वसाधारण सभेत यावर जाब विचारला असता, त्यांना सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागले आणि तेव्हा त्यांना रिक्षातून पळून जावे लागले होते."
या आर्थिक गैरव्यवहारानंतर पाटकर यांचे सभासदत्वच रद्द झाले आहे. त्यामुळे त्यांना ही निवडणूक लढविण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असा दावा शेलार यांनी केला. पाटकर यांना जर उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, तर त्यांनी स्वतः उपस्थित राहून तो भरायला हवा होता. ते का आले नाहीत? त्यांना कोणी डांबून ठेवले होते का? किंवा एखाद्या मंत्र्याचा दबाव होता का? हे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट करावे, असे आव्हानही शेलार यांनी दिले. तसेच, या संदर्भात कोणताही पुरावा किंवा कॉल रेकॉर्डिंग असेल तर ते सादर करावे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
धनाजी यमकर यांनीही पाटकर यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "ज्या महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर तुम्ही विराजमान होतात, त्याच संस्थेला तुम्ही 'थडगे' म्हणत आहात, हे कितपत योग्य आहे?" असा संतप्त सवाल यमकर यांनी केला. घरात बसून केवळ 'टीव-टीव' करण्यापेक्षा, तुमच्याच लोकांनी तुमचा फॉर्म बाद केला आहे, हे सत्य मान्य करा, असा टोलाही त्यांनी लगावला.
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मैदानात रंगत वाढली असतानाच, जुन्या आर्थिक बाबींचे पुरावे समोर आणून विरोधकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न माजी पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. आता पाटकर या आरोपांना कशा प्रकारे उत्तर देतात आणि निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.