आजरा : अपघातग्रस्त कार 
कोल्हापूर

Ajra Road Accident | शेवटचा पेपर संपल्यानंतर मित्रांसोबत फिरणे बेतले जीवावर

कार झाडावर आदळून आजऱ्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू; एकजण गंभीर

पुढारी वृत्तसेवा

आजरा: आजरा-आंबोली मार्गावरील धनगरमोळाजवळ कारवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात अकरावीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. समर्थ पांडुरंग पांगम (वय १७, रा. परोली रोड, आजरा) असे त्याचे नाव आहे. संस्कार अमित सुतार (१७, रा. बर्डे गल्ली, आजरा) हा गंभीर जखमी असून प्रथमेश ढुंडाप्पा वाजंत्री (१७, रा. गांधीनगर, आजरा) सुखरूप बचावला आहे. हा अपघात बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

समर्थ, संस्कार आणि प्रथमेश हे तिघेही आजरा महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिकतात. परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यानंतर सुट्टी सुरू होत असल्याने तिघांनी कारने फिरण्याचा बेत आखला. हॉटेलमध्ये जेवण करून परत येत असताना धनगरमोळाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यापलीकडे जाऊन झाडावर जोरात आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, समर्थचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी संस्कारला तातडीने गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारच्या मागील सीटवर बसलेला प्रथमेश सुखरूप वाचला. आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सरवदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

संघर्षातून उभा राहिलेल्या कुटुंबाला धक्का

मृत समर्थ हा अभ्यासात हुशार आणि प्रामाणिक होता. मूळच्या कोकणातील असलेल्या त्याच्या वडिलांनी अत्यंत संघर्षातून आंबोली मार्गावर स्वतःची नर्सरी विकसित केली आहे. फळ व फूलझाडांच्या रोपांची विक्री करून कुटुंबाची आर्थिक प्रगती होत असतानाच एकुलता मुलगा गमावल्यामुळे पांगम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT