कोल्हापूर : एक कोटीच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण आणि जिवे मारण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात वापर झालेल्या दोन मोटारी राजवाडा पोलिसांनी गुरुवारी जप्त केल्या. गुंड अजित तिवडेसह टोळीतील साथीदारावर पुन्हा ‘मोका’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्याच्या हालचाली वरिष्ठस्तरावर सुरू झाल्या आहेत. म्होरक्या तिवडे याचा जामीन रद्द करण्यासाठीही पोलिस अधिकाऱ्यांनी विधी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केल्याचे समजते.
गुंड अजित तिवडे व त्याच्या संघटित टोळीतील सराईतांनी केलेल्या कारनाम्याची विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दखल घेतली आहे. खंडणी वसुली, अपहरण व व्यावसायिकास दिलेल्या धमकीप्रकरणी सखोल चौकशी करून संशयितांवर कठोर कारवाई करण्याच्या त्यांनी सूचना केल्या आहेत. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनीही पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्याशी संपर्क साधून सायंकाळी तपासाचा आढावा घेतला. एक कोटीच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक नीलेश सुरेश जाधव (रा. माेरे-मानेनगर, कळंबा) यांचे अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी म्होरक्या अजित तिवडेसह पाच जणांविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पसार झालेला संशयित लालाशेठ याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अजित तिवडेसह साथीदारावर यापूर्वी ‘मोका’अंतर्गत कारवाई झाली होती. सध्या त्याची जामिनावर सुटका झाली आहे. खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने ‘मोका’ न्यायालयात जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवाय, तिवडेसह टोळीवर ‘मोका’अंतर्गत कारवाईच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत, असे सांगण्यात आले.