प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अरुण डोंगळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  (Pudhari Photo)
कोल्हापूर

Kolhapur Politics | कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुसाट; गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा पक्षप्रवेश

Ajit Pawar NCP Kolhapur | डोंगळे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे पक्षाला १०० हत्तींचे बळ - मुश्रीफ

अविनाश सुतार

Arun Dongle joins NCP

कोल्हापूर: गोकुळचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी आज (दि.२३) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वैदयकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, अरूण डोंगळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशामुळे आमच्या पक्षाला 100 हत्तींचे बळ आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे. डोंगळे यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून चूक केली, असे वाटू देणार नाही. पक्षाकडून त्यांचा मानसन्मान राखला जाईल.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत ते म्हणाले की, जिथे आमचे जमणार नाही तिथे मित्रपक्षांवर टीका न करता आम्ही लढू आणि निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवू,असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप खासदार धनंजय महाडिक, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जास्त जागांची मागणी केली असली तरी आम्हीही 20 वर्ष सत्तेत आहे. कोल्हापूर महापालिकेवर राष्ट्रवादी झेंडा फडकवला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अरूण डोंगळे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष प्रवेश आज केला आहे. पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्ष देईल, ती जबाबदारी पार पडणार आहे. माझ्या प्रवेशामुळे शंभर हत्तींचे बळ मिळाले की नाही माहित नाही. पण हत्तीला उठ आणि बस म्हणायची ताकद पक्षात आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते पी.एन.पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी नुकताच प्रवेश केला आहे. आता राधानगरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते अरूण डोंगळे यांचा प्रवेश आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या ताकदीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

याप्रसंगी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष आ.शिवाजीराव गर्जे, आ. विक्रम काळे, आ. इद्रिस नायकवडी, आ. संजय खोडके, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार फारूख शाह, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सह कोषाध्यक्ष संजय बोरगे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT