दादांचा राजकारणापलीकडील ‘कोल्हापुरी’ ऋणानुबंध 
कोल्हापूर

दादांचा राजकारणापलीकडील ‘कोल्हापुरी’ ऋणानुबंध

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव जितकं बारामतीशी जोडलं गेलं आहे, तितकंच ते कोल्हापूरशीही घट्ट विणलेलं होतं. कोल्हापूरच्या रांगड्या मातीला आणि इथल्या माणसांच्या रोखठोक स्वभावाला साजेसा असाच दादांचा पिंड होता. त्यांच्या जाण्याने कोल्हापूरने केवळ राज्याचा उपमुख्यमंत्री गमावला नाही, तर जिल्ह्याच्या विकासाचा एक मजबूत पाठीराखा गमावला आहे. त्यांचा कोल्हापूरच्या माणसांशी आणि इथल्या मातीशी असलेला ऋणानुबंध राजकारणापलीकडचा होता.

शिक्षणाचे माहेरघर आणि आठवणींची शिदोरी

अजितदादांचे कोल्हापूरशी असलेले नाते खूप जुने होते. खुद्द शरद पवार यांचे आजोळ कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. इतकेच नाही, तर अजितदादांनी स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण काही काळ कोल्हापुरातील गोखले कॉलेज, शहाजी कॉलेजमध्ये घेतले होते. त्यामुळे इथल्या गल्ली-बोळांची आणि इथल्या माणसांच्या नाडीची त्यांना पूर्ण पारख होती. कोल्हापूरबद्दल बोलताना दादांच्या बोलण्यात नेहमीच एक वेगळी आपुलकी जाणवत असे. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून दादांनी कोल्हापूरच्या झोळीत नेहमीच भरभरून दान दिले.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी जेव्हा 800 कोटींची मागणी झाली, तेव्हा दादांनी अधिकारवाणीने 1000 कोटी रुपये मंजूर केले. ‘कामात कसलीही कसर राहता कामा नये,’ हा त्यांचा शब्द कोल्हापूरकरांसाठी मोलाचा ठरला. रंकाळ्याचे प्रदूषण असो किंवा शहराला स्वच्छ पाणी देणारी थेट पाईपलाईन योजना, दादांनी केवळ निधीच दिला नाही, तर पहाटे 6 वाजता स्वतः उपस्थित राहून या कामांची पाहणी केली. प्रशासनाला कामाचा दर्जा राखण्यासाठी त्यांनी दिलेला दम कोल्हापूरच्या विकासासाठी फायदेशीर ठरला. कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा महोत्सव जागतिक स्तरावर पोहोचावा, यासाठी दादांनी विशेष लक्ष दिले होते.

‘कोल्हापूर माझं आहे’ ही भावना त्यांनी कायम जपली ती अखेरच्या श्वासापर्यंत. याचे उदाहरण द्यायचं झालं, तर रंकाळ्यावरील पहाटेचा तो दौरा... अजितदादांचा कोल्हापूर दौरा म्हणजे प्रशासनासाठी कसोटी आणि जनतेसाठी कौतुक असायचे. इथल्या लाल मातीत दादांच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत.

एकदा दादा कोल्हापूर दौर्‍यावर असताना शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. कोल्हापूरचे अधिकारी निवांत होते की, दादा सकाळी 10 वाजता कामाला लागतील; पण सकाळी 5.30 वाजता दादांचा फोन थेट आयुक्तांना गेला. दादा कोणालाही न सांगता रंकाळा तलावावर पोहोचले होते. तिथे सुरू असलेल्या कामाचा दर्जा पाहून त्यांनी तिथल्या तिथे अधिकार्‍यांची कानउघाडणी केली आणि सकाळी 7 वाजेपर्यंत अर्धी रिव्ह्यू मीटिंग रंकाळ्याच्या काठावरच संपवली होती.

कोल्हापुरात आल्यावर दादांच्या पाहुणचारासाठी हमखास तांबडा-पांढरा रस्सा असायचा. दादा स्वतः आरोग्याबाबत खूप जागरूक होते; पण कोल्हापूरच्या प्रेमापोटी ते इथल्या जेवणाचा आस्वाद घ्यायचे. एकदा एका कार्यक्रमात जेवताना त्यांनी गमतीने म्हटले होते, ‘कोल्हापूरकरांचं प्रेम आणि इथला रस्सा दोन्ही झणझणीत आहेत. त्यामुळे इथं आल्यावर डाएट बाजूला ठेवावं लागतं!’ अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची फाईल जेव्हा दादांकडे आली, तेव्हा काही तांत्रिक कारणांमुळे निधी अडकला होता. कोल्हापूरच्या शिष्टमंडळाने दादांची भेट घेतली. दादांनी फक्त 15 मिनिटे चर्चा केली. फाईलवरची त्रुटी स्वतः बसून दुरुस्त करून घेतली आणि सांगितले, ‘आई अंबाबाईचं काम आहे, पैशाची काळजी करू नका, फक्त काम दर्जाचं करा.’ या एका शब्दावर आराखड्याला गती मिळाली.

कोल्हापूरच्या चप्पल मार्केटमधील व्यापार्‍यांच्या एका प्रश्नावर दादांनी त्यांना मंत्रालयात बोलावले होते. बैठकीत दादांनी स्पष्ट सांगितले, तुमची चप्पल जगप्रसिद्ध आहे; पण ब—ँडिंगमध्ये तुम्ही कमी पडताय. त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला कोल्हापुरी चपलेसाठी क्लस्टर आणि मार्केटिंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. ‘काम कसं करून घ्यायच’ याचा वस्तुपाठच त्यांनी त्या दिवशी दिला होता.

2019 आणि 2021 च्या महापुराच्या वेळी दादा कोल्हापुरात तळ ठोकून होते. एका गावात पाहणी करताना पाणी गुडघाभर होते. सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; पण दादांनी पायजमा वर दुमडला आणि थेट चिखलात उतरून लोकांच्या घरापर्यंत पोहोचले. ‘मंत्री एसी गाडीत बसून नाही, तर जमिनीवर उतरून काम करतो,’ हे त्यांनी कोल्हापूरकरांना दाखवून दिले होते. दादांच्या या आठवणी सांगताना आजही कोल्हापूरचा सामान्य माणूस म्हणतो, ‘असा रोखठोक आणि कामाचा माणूस पुन्हा होणे नाही!’

मैत्री आणि राजकारणापलीकडचे नातं

कोल्हापूरच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असलेली त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. मुश्रीफ आणि दादांचे समीकरण म्हणजे कोल्हापुरातील राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चढ-उतार आले; पण कोल्हापूरच्या प्रश्नांवर दादांनी कधीही राजकारण आणले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT