कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत वाढवली जाईल, यासह विमानतळ विस्तारीकरणाचा 374 कोटींचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम सुरू असल्याचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगितले. कोल्हापूर विमानतळावरील नवीन एटीसी टॉवर, अग्निशमन केंद्र, व्हीआयपी कक्षाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कोल्हापूर-नागपूर या नव्या हवाई सेवेचाही त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
मोहोळ म्हणाले, कोल्हापूरची धावपट्टी सध्या 1,900 मीटर आहे ती 2,300 मीटरपर्यंत वाढवण्यात येत आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय सेवाही सुरू व्हाव्यात, याकरिता ही धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. प्राधिकरणाकडून त्याचा ‘डीपीआर’ तयार केला जात आहे. सध्याचे धावपट्टी विस्तारीकरणही वेगाने केले जात आहे. या सर्व कामात भूसंपादनाची कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले. लवकरच फ्लाईट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार असून, त्याकरिता मुंबई एव्हिएशन कंपनीकडून सर्व्हे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळावर देखभाल-दुरुस्ती केंद्रासह कार्गो सेवेसाठी आवश्यक सेटअप उभारण्यात जाईल. एरोब्रिजसह हँगरची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
देशातील सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवास करता यावा, याकरिता सुरू असलेली ‘उडान’ योजना आणखी दहा वर्षे सुरू राहणार आहे, असे सांगत मोहोळ म्हणाले, या दहा वर्षांत 4 कोटी 50 लाख लोक प्रवास करतील. याकरिता नवीन 120 मार्ग निश्चित केले आहेत. पुढील पाच वर्षांकरिता देशातील विमान कंपन्यांनी 1,300 नव्या विमानांची ऑर्डर दिल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोकराव माने, एअर नेव्हिगेशन सर्व्हिसचे प्रमुख एम. सुरेश, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विमानतळ संचालक अनिल शिंदे, महेश जाधव, विजय जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.