कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी आता 2,300 मीटर होणार आहे. विमानतळाच्या विकासासाठी 290 कोटी 23 लाख रुपयांच्या खर्चाला दुसरी सुधारित वित्तीय व प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिल्याने धावपट्टी विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कोल्हापूर-हुपरी रस्त्यासाठी भूसंपादन केले जाणार असून, या सर्व प्रक्रियेला महिनाभरातच प्रारंभ होणार आहे.
कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी 2,300 मीटरपर्यंत विस्तारित करण्यास पूर्वीच मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आवश्यक भूसंपादनासाठी 212 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आले. दरम्यान, 1,900 मीटरपर्यंतचे विस्तारीकरणाचे काम झाल्यानंतर उर्वरित भूसंपादनासह कोल्हापूर-हुपरी रस्त्यामुळे विस्तारीकरणाचे काम रखडले.
सध्याचा सुरू असलेला कोल्हापूर-हुपरी रस्ता बंद करण्याबाबत विविध पर्यायांवर चर्चा झाली. मात्र, हा रस्ता बंद करून तो पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वळवण्यात येणार्या नव्या रस्त्यासाठी 3.60 हेक्टर जमिनीच्या संपादनाची आवश्यकता आहे. याकरिता अतिरिक्त 37 कोटी, तर हा रस्ता नव्या जागेतून बांधण्यासाठी 11 कोटी 78 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. यासह अन्य खर्चासह एकूण 78 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची गरज होती. त्यानुसार एकूण 290 कोटी 23 लाख रुपयांच्या निधीच्या प्रस्तावाला वित्तीय व प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे 2,300 मीटरपर्यंत धावपट्टी विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटर केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्यानुसार धावपट्टी तीन हजार मीटर करण्यासाठीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. याकरिता सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक मंगळवारी कोल्हापुरात आले होते. या पथकाने सुरक्षिततेच्या द़ृष्टीने धावपट्टी विस्तारीकरणासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले.