उजळाईवाडी : कोल्हापूर विमानतळावर गुरुवारी विमान अपहरणाची आपत्कालीन स्थिती निर्माण करून घेण्यात आलेल्या 'अँटी हायजॅकिंग मॉक एक्सरसाईज-२०२६' मध्ये सुरक्षा यंत्रणांनी अवघ्या ५७ मिनिटांत यशस्वी कारवाई करत आपली सज्जता सिद्ध केली. दोन सशस्त्र अपहरणकर्ते, ३४ प्रवासी, गोळीबार आणि बॉम्बस्फोटाची धमकी अशा आव्हानात्मक प्रसंगी विविध विभागांनी समन्वयाने काम करत हा सराव पूर्ण केला.
मुंबईहून चेन्नईकडे जाणाऱ्या VTABC विमानाचे अपहरण झाल्याचा संदेश वैमानिकाने सकाळी ९.४८ वाजता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिला. विमानात ३४ प्रवासी आणि दोन सशस्त्र अपहरणकर्ते असल्याची माहिती मिळताच विमान धावपट्टी क्रमांक २५ वर उतरवून आयसोलेशन पार्किंग बे येथे उभे करण्यात आले. शीघ्र प्रतिसाद दलाने तातडीने विमानाभोवती सुरक्षा घेरा उभारला. स्वतःला 'ब्लॅक पँथर' म्हणवणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या म्होरक्याने कारागृहातील साथीदाराची सुटका, एक दशलक्ष डॉलरची खंडणी आणि विमानात इंधन भरून सीरियाला जाण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास प्रवाशांना ठार मारण्याची धमकी दिली. सरावात गोळीबार, बॉम्बची धमकी आणि प्रवाशाला बाहेर फेकण्यासारख्या परिस्थितीचा समावेश होता. तसेच प्रकृती बिघडलेल्या दोन प्रवाशांना वाटाघाटी करून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून वैद्यकीय मदत देण्यात आली.
जिल्हाधिकारी तथा विमानतळ समितीचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड, विमानतळ संचालक माधव राव सोनकुसले आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पंकज पाल यांच्या समन्वयातून अंतिम कारवाई झाली. QRT पथकाने इंधन बाऊझरच्या मदतीने विमानाच्या मागील बाजूने शिरकाव करत दोन्ही अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले, तर BDDS पथकाने विमानाची तपासणी केली. सकाळी ९.४८ वाजता सुरू झालेला हा सराव १०.४५ वाजता यशस्वीरीत्या संपला.