उजळाईवाडी : पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडून विमानतळ गेटकडे जाताना आंदोलक. (छाया : दौलत कांबळे) 
कोल्हापूर

Airport boundary road protest | पर्यायी रस्त्यासाठी विमानतळ प्रशासनाविरोधात धडक मोर्चा

पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा ठिय्या; जिल्हाधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

पुढारी वृत्तसेवा

उजळाईवाडी : ‘रस्ता आमच्या हक्काचा... विमानतळ प्रशासनाचा धिक्कार असो...’ अशा घोषणा देत तामगावसह पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पर्यायी रस्ता द्या किंवा बंद केलेला रस्ता खुला करा, या मागणीसाठी थेट विमानतळ गेटवर धडक देत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिष्टमंडळाला पर्यायी रस्ता लवकर देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

विमानतळ प्रशासनाकडून दिल्ली येथील बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेच्या कारणास्तव उजळाईवाडी-तामगाव विमानतळ हद्दीतून जाणारा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे कोल्हापूरसह उजळाईवाडी, तामगाव, नेर्ली, हलसवडे, कागल एमआयडीसीमध्ये दररोज ये-जा करणारी वाहतूक थांबली. तीन किलोमीटरचा रस्ता बंद केल्याने चौदा किलोमीटरचे अंतर फिरून कोल्हापुरात यावे लागत आहे. पर्यायी रस्ता न दिल्याने मोर्चा काढला.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन गोकुळ शिरगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक टी. जे. मगदूम यांनी अधिक कुमक मागवली. पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांच्यासह गांधीनगरचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांचे पथक व जादा तुकडी मागवण्यात आली.

जोपर्यंत विमानतळ संचालक अनिल शिंदे येऊन रस्ता खुला करत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त आंदोलकांनी विमानतळाच्या विकासात आमच्या जमिनी गेल्या आहेत. रस्ता बंद करताना आम्हाला विचारून बंद केला का? जोपर्यंत पर्यायी रस्ता किंवा बंद केलेला रस्ता खुला करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधून शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी येडगे यांनी पीडब्ल्यूडी तसेच महसूल अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन पर्यायी रस्ता लवकरच देण्याची ग्वाही दिली. यावर शिष्टमंडळाने तोपर्यंत हा रस्ता सुरू करावा, अशी मागणी केली. हा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे, असे येडगे यांनी सांगितले. लवकरच तुम्हाला पर्यायी रस्ता देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे त्यांनी सांगितले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात तामगावच्या सरपंच सुरेखा हराळे, हेमंत पाटील, राजू पावंडे, संग्राम पाटील, राजू माने, विराज पाटील, महेश पाटील, नारायण पवार, माणिक जोंधळेकर, महेश जोंधळेकर, अरविंद कर्णिक, तानाजी सासने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...मग विमानतळ असुरक्षित कसे?

विमानतळाची कंपाऊंड भिंत अद्याप पाच किलोमीटर अंतराची झालेली नाही. पण विमानतळ प्रशासनाकडून तामगाव रस्ता सुरक्षित नाही या कारणास्तव बंद केला आहे. भिंतच पूर्ण झाली नसेल तर रस्त्यामुळेच फक्त विमानतळ असुरक्षित कसे? असा सवाल आंदोलकांकडून उपस्थित केला जात आहे. या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT