कोल्हापूर

हवा प्रदुषणाने वाढले सर्दी , खोकला, तापाचे रुग्ण

दिनेश चोरगे

कोल्हापूर : सध्या सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. याला व्हायरल इन्फेक्शन, हवामानातील बदलासह हवा प्रदूषणही तितकेच जबाबदार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात, राज्यात आणि शहरात वाढलेले हवा प्रदूषणाचा आघात आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. कोल्हापुरातील नागरिकांच्या आरोग्यावर हवा प्रदूषणामुळे होणार्‍या परिणामांचा आरोग्य विभागाकडून अभ्यास केला जात आहे. यासाठी सर्दी, खोकला, ताप यासह श्वसनाच्या गंभीरआजारांनी त्रस्त 1 हजार 814 रुग्णांचा डेटा संकलित करण्यात आला आहे. वायू प्रदूषणामुळेच श्वसनाच्या आजारांमध्ये ही वाढ होत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापुरकरांसाठी हवा प्रदूषण धोक्याची घंटा बनत चालली आहे. शहरातील हवेमध्ये वाढलेले अतिसूक्ष्म व श्वसनीय धुलीकणांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटर) धोकादायक बनले आहे. पार्टिक्युलेट मॅटर थेट फुफ्फुसात जाण्याचा धोका असतो. याचे प्रमाण जास्त झाले, तर शरीरावर परिणाम होण्याचा धोका असतो. हाच घटक आरोग्य बिघडवण्यास विशेषतः सर्दी, खोकला, ताप, श्वाशोश्वासास त्रास, छाती भरणे-घरघरणे, चक्कर, डोके दुखी अशा समस्या निर्माण करतो.

हवा प्रदूषणामुळे भेडसावणार्‍या या श्वसनाच्या समस्यांचा अभ्यास आरोग्य विभाकडून केला जात आहे. याकरिता कोल्हापूर जिल्ह्यात श्वसनाच्या आजारांंनी त्रस्त असणार्‍या नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे. त्यानुसार गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल 383 जणांना श्वसनाचे गंभीर आजार झाले आहेत. 109 रुग्णांना व्हेंटिलेटरवर लावावा लागला आहे. 300 हून अधिक जणांना खोकल्याचा तसेच श्वाशोश्वास घेण्यास त्रास झाला आहे. तर 250 हून अधिक जणांना ताप आला आहे.

या रुग्णांना श्वसनाचे हे आजार जडण्यामागे व्हायरल इन्फेक्शन, हवामानातील बदल यासह हवा प्रदूषणही एक मुख्य कारण असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असणार्‍या रुग्णांची सर्व माहिती आरोग्य विभागाकडून संकलित केली जात आहे.

आजाररुग्ण

खोकला ……..300
श्वास घेण्यास त्रास…. ……………….290
ताप………….250
छाती भरणे……150
घसा येणे……..90
नाक गच्च होणे..70
सकाळी शिंका येणे.60
धडधड………..60
घरघर………….40
डोकेदुखी………20
चक्कर………..10

सध्या शहरात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. वायू प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यात येत आहे. त्यासाठी श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची सर्व माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने संकलित केली जात आहे.
– डॉ. संजय रणवीर,
प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी

श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. सर्दी, खोकला, ताप यासह श्वसनाच्या वाढत्या आजारांमागे हवा प्रदूषण हे एक मुख्य कारण असू शकते. पार्टिक्युलेट मॅटर (पीएम 2.5 व पीएम 10) मुळे केवळ श्वसनसंस्थेशीच नाही तर हृदय, मेंदू, किडणीच्या आजारांचा धोकादेखील उद्भवू शकतो.
– डॉ. अनिता सैबनवार, सीपीआर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT