सुनील कदम
कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापरातील धोक्याबाबत जगभरातील तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यांचा आता प्रत्यय येऊ लागला आहे. कारण गुन्हेगारांच्या हातात गेलेल्या या तंत्रज्ञानाने आता स्वत:च गुन्हेगारीच्या वाटेवर चालायला सुरुवात केल्याचे ‘चेक पॉईंट रिसर्च’ या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
जगभरातील अनेक गुन्हेगारांनी गेल्या चार-पाच वर्षांत आपल्या कारवायांसाठी मोठ्या प्रमाणात एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला होता. सुरुवातीच्या टप्प्यात हे तंत्रज्ञान गुन्हेगारांना केवळ सहाय्यभूत ठरत होते, पण आता एआयने स्वत:च गुन्नहेगारीच्या मार्गावर वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे. चेक पॉईंट रिसर्च या जागतिक पातळीवरील सायबर सुरक्षा विषयक संस्थेच्या ताज्या अहवालात यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. एआय आता टेहळणी, पिळवणूक, छळवणूक, धोकादायक मालवेअरचा फैलाव, आक्षेपार्ह रचना तयार करणे अशासारख्या गुन्हेगारी कृत्यामध्ये स्वत:च स्वत:ला आदेश देऊन कार्यरत होत असल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडला आहे. ही बाब जगभरातील सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने एक अहवाल प्रसिध्द करून कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी समुहाच्या दृष्टीने विनाशकारी ठरण्याचा इशारा दिला होता. या अहवालात असा दावा करण्यात आला होता की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगातील मानवी समुहासमोर फार मोठा आण्विक धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे या बाबतीत सध्या जगभर सुरू असलेले प्रयोग रोखले नाहीत तर संपूर्ण जगापुढेच अस्तित्वाचे संकट निर्माण होऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कोणत्याही समस्येचे उत्तर शोधले जावू शकते, पण त्यामध्ये तेवढेच धोकेही दडले असल्याकडे या अहवालाने जगाचे लक्ष वेधले होते. तसेच अमेरिकेतीलच फ्युचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूट या संस्थेने जगभरातील सर्व देशांना एक खुले पत्र पाठवून या तंत्रज्ञानाचे सध्या सुरू असलेले सगळे प्रयोग तातडीने बंद करा, असे आवाहन केले होते. आता या इशाऱ्यांचा प्रत्यय येत आहे.
एआय तंत्रज्ञान स्वत:च स्वत:ला आदेश देऊन किंवा रोबोटच्या माध्यमातून जगाला धोका पोहोचविण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण या प्रणालीसाठी मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर्स, सिलिकॉन आणि करोडो वॅट ऊर्जा लागेल. हे सगळे सध्यातरी स्वत: एआयकडे उपलब्ध नाही. भविष्यात ते उपलब्ध होण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे मोठ्या वेगाने एआय क्षेत्रात वाटचाल करीत असलेल्या भारतीयांना या तंत्रज्ञानाच्या वापरापासून परावृत्त करण्यासाठी रचलेले हे जागतिक षड्यंत्र असण्याचीही शक्यता आहे.प्रा. किरणकुमार जोहरे, ज्येष्ठ एआय आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञ, नाशिक