kolhapur | आता ‘एआय’च्या मदतीने होणार ऊर्जा वापराचे ‘स्मार्ट मॉनिटरिंग’! 
कोल्हापूर

kolhapur | आता ‘एआय’च्या मदतीने होणार ऊर्जा वापराचे ‘स्मार्ट मॉनिटरिंग’!

इंधन संकटावर शिवाजी विद्यापीठाचे संशोधन सुरू

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण मस्के

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने आंतरविद्याशाखीय ऊर्जा संशोधन दृष्टिकोन स्वीकारला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान व पर्यावरण विज्ञान विभागांकडून एकत्रित हरित हायड्रोजन, सौर ऊर्जा साठवण व जैवइंधन या क्षेत्रात संशोधन होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून परिसरातील ऊर्जा वापराचे ‘स्मार्ट मॉनिटरिंग’ केले जाणार आहे. याच्या माध्यमातून अपव्यय लक्षणीय प्रमाणात कमी होईल.

जागतिक पर्यावरण दिन यंदा ‘हवामान कृती आता हवामानासाठी’ या संकल्पनेखाली होत आहे. शिवाजी विद्यापीठाने ८५३ एकर परिसरास एका जिवंत हरित प्रयोगशाळेमध्ये रूपांतरित करण्याबरोबरच शून्य जीवाश्म इंधन परिसर हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यादिशेने ठोस पावले उचलली आहेत. मुख्य प्रशासन इमारतीवर १०० किलोवॅट व रसायनशास्त्र विभागाच्या छतावर ८० किलोवॅट असे एकूण १८० किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत. वसतिगृहे, अतिथिगृह व निवासी बंगल्यांमध्ये ५५ हजार २५० लिटर क्षमतेची सौर जलतापन व्यवस्था उभारली आहे. तंत्रज्ञान विभागात १०० किलो क्षमतेचा बायोगॅस प्लांट कार्यरत आहे. यातून ४ किलो बायोगॅस तयार होतो, जो वसतिगृहाच्या मेससाठी वापरला जातो.

कोल्हापूर परिसरात साखर कारखाने जास्त असल्याने इथेनॉल उत्पादन व पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण ही एक मोठी स्थानिक संधी आहे. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य जाहीर केले आहे. शिवाजी विद्यापीठाने स्थानिक साखर उद्योगाशी संशोधन सहकार्याचे धोरण ठेवले आहे. आगामी काळात जैवइंधन तंत्रज्ञानाचा विस्तार शेतकरी, उद्योग व पर्यावरण या तिन्हींसाठी लाभकारक ठरेल.

२८० हून अधिक महाविद्यालयांनाही होणार मार्गदर्शन

शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी भवन येथे ४०० किलो क्षमतेचा बायोगॅस प्लांट उभारला आहे. स्वयंपाक घरातील ओला कचरा थेट ऊर्जेत रूपांतरित करण्याचे हे शून्य कचरा धोरण विद्यापीठाने राबवण्याचे हे राज्यातील अनोखे उदाहरण आहे. आगामी वर्षात आणखी ३५० किलोवॅट सौर क्षमता वाढवण्याचे नियोजन आहे. संलग्न २८० हून अधिक महाविद्यालयांनाही सौर रूपांतरासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

पृथ्वी वापरासाठी आहे, शोषणासाठी नाही. शिवाजी विद्यापीठ केवळ सौर पॅनेल बसवत नाही तर ते एक विचारप्रणाली बदलत आहे. येत्या काही वर्षांत राज्यातील विद्यापीठांनी एकत्र येऊन असा संशोधन आराखडा तयार करायला हवा, जो महाराष्ट्र व देशाला इंधन स्वातंत्र्याच्या दिशेने घेऊन जाईल.
डॉ. आर. के. कामत, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT