सध्या जगभरात एआयचा बोलबाला आहे. लाखो लोक याचा मुक्त हस्ते वापर करत आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रात एआयने प्रवेश केलेला आहे. मग याला राजकारण हे क्षेत्र तरी कसे अपवाद ठरेल? एआयने महाराष्ट्राच्या राजकारणातही नुकताच चंचुप्रवेश केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ‘निर्धार मेळावा’ नुकताच नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात एआय भाषण दाखवण्यात आले. या भाषणाचा आवाज तंतोतंत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा होता. या भाषणातून भाजपवर चौफेर टीका करण्यात आली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. आज तुफान गर्दी दिसतेय. अरे, नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचे एक नाते नाही म्हटले तरी आहेच, ते राहणारच. ते नरेंद्र मोदी म्हणतात, तसे हे नाते नाही. नाशिक से पुराना नाता हैं. मैं यहां वीर सावरकरजी के साथ काम करता था और जॅक्सन के वध में मेरा ही प्लॅन था. अरे, जातील तिथे गंडवायचं आणि लोकंही गंडतात, अशी टीका बाळासाहेब ठाकरे यांच्या एआय भाषणातून करण्यात आली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या एआय भाषणात पुढे म्हटले, ही काही नाती जपणारी माणसं नाहीत. कमळाबाईचं ढोंग आहे. भाजपला महाराष्ट्रात काय देशातही कुणी ओळखत नव्हते, तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. खांदा म्हणजे आधाराचा हो. महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं; पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. आमचे 25 वर्षे त्यांच्यासोबत एक नाते नक्कीच होत, अर्थात हिंदुत्व म्हणून. महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले. बरोबर ना? मग नातं तोडलं कुणी? माझ्या पोतडीत यांच्या बर्याच गोष्टी आहेत. हळूहळू काढतो. त्यातच मजा आहे. नाहीतर एकदम खेळ आटोपून जाईल हो. विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला, तो तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही मते कोणाला दिली आणि निवडून कोण आले? अहो हे भाजप आणि त्या नकली शिवसेनावाल्यांनी असे काय दिवे लावले, की ज्यामुळे त्यांना अशी भरभरून मते पडली? लोकशाहीत असे निकाल जबरदस्तीने लावले जात असतील, तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय? ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही. असे म्हणत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवसेना शिंदे गटाचा तर त्यांनी ‘गद्दार’ असा उल्लेख केला. तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, मोठी पदे मिळवाल; पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दाखवण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या या एआय भाषणावर भारतीय जनता पक्षाकडून मात्र जोरदार टीका करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याचा ‘बालिश नौटंकी’ असा उल्लेख केला असून, यातून काहीही साध्य होणार नाही, असे म्हटले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेनेही या प्रयोगावर जोरदार टीका केली असून, आज जर बाळासाहेब असते तर हिंदुत्वापासून दूर जाणार्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांना लाथाच घातल्या असत्या, असे म्हटले आहे. या निमित्ताने असाच प्रयोग भविष्यात कदाचित भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांकडून करण्यात आला, तर याचे आश्चर्य वाटायला नको.
कदाचित भविष्यातील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अटलबिहारी वाजपेयी, काँग्रेसकडून इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या आवाजातील एआय भाषणे लोकांना ऐकवली जातील. या भाषणांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जातील. मात्र, दिवंगत नेत्यांच्या आवाजाच्या माध्यमातून जे विचार येथे व्यक्त होतील, ते त्यांचे म्हणता येतील का? आणि महाराष्ट्रातील जनतेला हे सगळे रुचेल का, हा खरा प्रश्न आहे.