illegal fertilizers seized | ‘कृषी’च्या भरारी पथकाने जप्त केली 28.40 लाखांची अनधिकृत खते  (Pudhari File Photo)
कोल्हापूर

illegal fertilizers seized | ‘कृषी’च्या भरारी पथकाने जप्त केली 28.40 लाखांची अनधिकृत खते

जैनापूर परिसरात कारवाई : बोगस खतांचा सुळसुळाट

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील जैनापूर परिसरात विनापरवाना अवैधरीत्या खते उत्पादन व विक्री करणार्‍या केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत 28 लाख 40 हजार 750 रुपये किमतीची अनधिकृत रासायनिक खते जप्त करण्यात आली.

जैनापूर परिसरात श्रीकृष्ण प्रभाकर पटवर्धन यांच्या मालकीच्या गट क्र. 166 मधील गोदामात खतांचे अवैध उत्पादन होत असून त्याची शेतकर्‍यांना विक्री केली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. या पथकाने गोदामावर छापा टाकला. यावेळी गोदामात सेंच्युरी अ‍ॅग्रो केमिकल्स, हडपसर, पुणे 13 या नावाने 15 प्रकारची खतसद़ृश उत्पादने मोठ्या प्रमाणात साठवलेली आढळून आली.

या कारवाईदरम्यान उपस्थित असणार्‍या अनय प्रशांत घुणागे (वय 21, रा. हडपसर पुणे) याच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा उत्पादन परवाना, विक्री परवाना किंवा कोणतेही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नव्हते. पटवर्धन यांच्या जागेत भाडे करारपत्राद्वारे अनय घुणागे विना परवाना अनधिकृतरीत्या खते उत्पादन व विक्री करत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

याप्रकरणी शिरोळचे कृषी अधिकारी, गुण नियंत्रण यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. आनंदराव हंबर यांनी पंच म्हणून काम पाहिले. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मस्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, तंत्र अधिकारी प्रल्हाद साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख कृषी विकास अधिकारी, जि. प. राजेंद्र माने, मोहीम अधिकारी जि. प. सुशांत लव्हटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे, कृषी अधिकारी, गुण नियंत्रण, हातकणंगले नंदकुमार मिसाळ व कृषी अधिकारी, गुण नियंत्रण निरीक्षक, शिरोळ अनुप रासकर यांनी संयुक्तपणे केली.

शेतकर्‍यांची फसवणूक

जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस खतांचा सुळसुळाट आहे. त्याद्वारे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. कृषी विभागाकडून बोगस खतप्रकरणी करवाई केली जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण आणखी वाढविण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT