कोल्हापूर : कीडानगरी कोल्हापुरात साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमचा उभारणीचा महत्वपूर्ण टप्पा, मंगळवारी पार पडणार आहे. स्टेडियमसाठी विकासवाडी (ता. करवीर) येथील 12 हेक्टर 76 आर अशी सुमारे 30 एकर इतकी शासकीय जागा देण्यात आली आहे. कब्जेहक्काने क्रीडा विभागाच्या नावावर झालेल्या या जागेवर स्टेडियम उभारणीबाबत राज्य शासन आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात मंत्रालयात दि.२१ रोजी दुपारी एक वाजता करार होणार आहे. यानंतर स्टेडियम उभारणीच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरवात होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील,जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे, बाळ पाटणकर यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे.
कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारावे, अशी मागणी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने संभाजीराजे यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी त्याबाबत तसेच विविध लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. विविध ठिकाणी जागांचा शोध घेतला, त्यात पुणे-बंगळूर महामार्गालगतच विकासवाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जमिनीपैकी 30 एकर जमिनीचा पर्याय समोर आला.
सातबारा उताऱ्यावर क्रीडा विभागाचे नाव
या जागेबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला अहवाल दिला. त्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवगंत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सादर केला. ३ सप्टेंबर २०२४ रोजी उच्चस्तरीय बैठक झाली. यानंतर या प्रक्रियेला गती आली. बैठकीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी विकासवाडी येथील 30 एकर जमीन कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर १० फेब्रुवारी २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली. दि.२ एप्रिल रोजी जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. यानंतर जागेची मोजणी होऊन, ही जागेच्या सातबारा उताऱ्यावर क्रीडा विभागाचे नाव लावण्यात आले.