कोल्हापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी कोल्हापुरात १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत अग्निवीर भरती होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडागंणावर होणाऱ्या या भरतीची प्रक्रिया सुरळीत पार पाडा, त्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या.
प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया १६ सप्टेंबरच्या रात्रीपासून सुरू होणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर प्रवेश पत्र पाठवण्यात येणार आहे. या भरतीसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील युवक मोठ्या संख्येने कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भरतीच्या तयारीची आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवा. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडा. भरतीसाठी मोठ्या संख्येने उमेदवार येण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या बसेस, भोजन, पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून द्या. या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी चोख वाहतूक व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था करा. गर्दी होणारे मार्ग वळवण्याची कार्यवाही करा. उमेदवारांच्या धावण्याचा मार्ग स्वच्छ करून घ्या. मैदानावरील गवत काढून घ्या. या जागेवर पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी अग्निवीर भरती प्रक्रियेचे संचालक कर्नल प्रशांतसिंग यांनी भरतीसाठी महसूल, पोलिस, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन दल, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सैनिक कल्याण विभाग तसेच अन्य विभागांचे सहकार्य मिळावे, असे आवाहन केले.
यावेळी ले. कर्नल संबित पात्रा, सुबेदार मेजर जसविंदर सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल भीमसेन चवदार (निवृत्त), जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार स्वप्निल पवार, महापालिका उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी अधिकारी उपस्थित होते.
आर्थिक आमिष, फसवणुकीला बळी पडू नका
अग्निवीर भरती पूर्णपणे गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर होणार आहे. यामुळे कोणत्याही उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहनही कर्नल प्रशांतसिंग यांनी केले.
महिला सेना पोलिस पदासाठीही भरती
अग्निवीर भरती प्रक्रियेत राज्याच्या महिला सेना पोलिस पदासाठीही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दि. २९ सप्टेंबर रोजी होणार आहे.