Agitation across the state for total debt relief of farmers
राजू शेट्टी Pudhari File Photo
कोल्हापूर

शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी 1 जुलैपासून राज्यभर आंदोलन : शेट्टी

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : शेतीमालाच्या आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळेच सोयाबीन, ऊस, कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी यासाठी 1 जुलैपासून राज्यभर दौरे आणि आंदोलन करणार आहे. यानंतरच विधानसभेला कोणाशी आघाडी करावी की नको, याबाबत निर्णय घेऊ. दूध पावडर आयातीचा निर्णय दूध उत्पादक आणि दूध संस्थांना संकटात नेणारा असल्याने या निर्णयाला कडाडून विरोध करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

पुसद येथून आंदोलनाला सुरुवात

जयसिंगपूर येथे शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. शेट्टी पुढे म्हणाले, 1 जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन हाती घेतले आहे. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी पुसद (जि. यवतमाळ) येथून आंदोलनाला सुरुवात होईल. राज्यातील 18 ते 20 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसाठी वंचितने प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यातील 30 ते 35 विधानसभा जागा लढवण्यास पोषक आहेत. मोठ्या प्रमाणावर दूध भुकटी शिल्लक असताना आयात करण्याची गरजच काय? केंद्र सरकार जाणीवपूर्वक शेतकरी आणि दूध संस्थांना अडचणीत आणण्याचे धोरण आखत असेल तर गप्प बसणार नाही. दूध पावडर आयात धोरणाविरोधात राज्यभर आंदोलन करणार असून, राहुरी (जि. अहमदनगर) येथून आंदोलनाची सुरुवात होईल, शेट्टी यांनी सांगितले.

कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही

ऊसदराच्या आंदोलनात जिल्हाधिकार्‍यांनी मध्यस्थी करत ज्या कारखान्यांनी तीन हजारांपेक्षा कमी दर दिला आहे, त्यांनी शंभर रुपये प्रतिटन, तर ज्या कारखान्यांनी तीन हजारांपेक्षा जास्त दर दिला आहे, त्यांनी प्रतिटन 50 रुपये जादा भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत जवळपास 180 कोटी रुपये शेतकर्‍यांना मिळणे अपेक्षित आहे. ही रक्कम शेतकर्‍यांना मिळाली नाही, तर कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नसल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला.

SCROLL FOR NEXT