illegal abortion case  
कोल्हापूर

Illegal Abortions Case | संबंधित दाम्पत्‍य, एजंटांनीच लावली गर्भांची विल्हेवाट

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : डॉ. चंद्रकांत गायकवाडने स्त्री भ्रूणहत्या केल्यानंतर त्या गर्भाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पेशंट घेऊन येणाऱ्या एजंटकडेच दिली होती. काहीवेळा एजंट ही जबाबदारी संबंधित दाम्पत्याकडे देत होते, अशी माहिती डॉ. चंद्रकांत गायकवाड याच्या चौकशीत समोर आली आहे. दरम्‍यान, गर्भपात करवून घेण्‍यासाठी आलेल्‍या सर्वच दाम्पत्यांची माहिती गोळा करण्याचे काम करवीर पोलिसांनी सुरू केले आहे.

डॉ. गायकवाडने वैद्यकीय परवान्याचे नूतनीकरण २०२३ नंतर केलेले नाही. याबाबतचे पत्रही त्याने मेडिकल असोसिएशनला दिले होते. मात्र यानंतरच्या काळातही त्याने अनेक रुग्णांवर शस्‍त्रक्रिया केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच याचदरम्यान तीनशेहून अधिक गर्भपात केल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे.

डॉक्टरही रडारवर

एजंट शिंदे, चव्हाण, डॉ. गायकवाड, शब्बीर यांच्या चौकशीत ३०० हून दाम्पत्यांसह आणखी काही डॉक्टरांची नावे समोर आली आहेत. नावे उघड होतील तसे त्यांना चौकशीसाठी बोलवले जाणार आहे.

म्‍हणे, मुलगा होण्याचेही औषध देतो...

डॉ. गायकवाड हा स्त्री भ्रूण असलेल्या महिलांचे गर्भपात करत होता. याचसोबत काही महिलांना तो मुलगा होण्याचे औषधही देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. गर्भपात केल्यानंतर माझ्याकडे औषधोपचार घ्या, तुम्हाला मुलगाच होईल असे औषध, उपचार करतो, असेही तो दाम्पत्यांना सांगत असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT