कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल लागल्यानंतर आता अध्यक्षपदाचा फेटा कोणाच्या डोक्यावर बांधला जाणार, याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे विजयाचा झेंडा फडकवलेल्या महिला सदस्यांमधून कोणाचे पारडे जड होणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. विजयी उमेदवारांच्या यादीत सर्वाधिक 18 जागा पटकावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्षपदाचा दावेदार ठरू शकतो, त्यामुळेच राष्ट्रवादीतून विजयी झालेल्या महिला सदस्यांपैकी काही नावांभोवती अध्यक्षपदाच्या निवडीची चक्र फिरू लागली आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या संभाव्य शक्यतेमध्ये सर्वाधिक चर्चा अमृता डोंगळे यांची आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांची कन्या, राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार आणि राजकीय पार्श्वभूमी यामुळे उच्चशिक्षित अमृता यांच्या नावाची चर्चा आहे. राजकारणातील अनुभव, उच्चशिक्षणाची पार्श्वभूमी या आधारावर शैलजा सतीश पाटील यांच्याही नावाची वर्णी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी लागू शकते. मानसी भोगन यांचेही नाव सध्या आघाडीवर आहे. पूजा पाटील यांनीही अध्यक्षपदाच्या नावाच्या चर्चेत लक्ष वेधून घेतले आहे.
उच्चशिक्षण व अभ्यासूवृत्ती असलेल्या राजकुंवर गायकवाड यांचेही नाव चर्चेत आहे. मानसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्यामुळे त्यांच्या स्नुषा राजकुंवर यांना संधी मिळू शकते. तर राष्ट्रवादीशी बंडखोरी केलेल्या शीतल फराकटे यांच्यामुळे राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या स्पर्धेत शोभा फराकटे यांच्या नावाचा विचारही अध्यक्षपदासाठी होऊ शकतो.
ज्यांच्या जास्त जागा त्यांचा अध्यक्ष
महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यापैकी ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात येईल, असा निकष निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे 18 जागांवर बाजी मारलेल्या राष्ट्रवादीकडेच अध्यक्षपदाची धुरा जाईल, हे निश्चित आहे. यानुसार नूतन जिल्हा परिषद सदस्यांमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या महिलांपैकी अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.