Madhuri Elephant | वर्षपूर्तीनंतर नांदणीच्या माधुरी हत्तीणीच्या पूनरागमनाची प्रतीक्षा! 
कोल्हापूर

Madhuri Elephant | वर्षपूर्तीनंतर नांदणीच्या माधुरी हत्तीणीच्या पूनरागमनाची प्रतीक्षा!

भावनांचा अनोखा संगम; आज नांदणीत ‘एक उपवास माधुरीच्या घरवापसीसाठी’

पुढारी वृत्तसेवा

संतोष बामणे

जयसिंगपूर : एका बाजूला १३०० वर्षांची पवित्र आध्यात्मिक परंपरा असलेला शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या नांदणी येथे प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, तर दुसऱ्या बाजूला गेली ३२ वर्षे या मठाचे आणि लाखो भाविकांचे चैतन्य बनून राहिलेली ‘महादेवी’ (माधुरी) हत्तीण! आज महादेवी हत्तिणीला गुजरात येथील वनतारामध्ये नेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षाचा हा विरह केवळ एका गावाचा किंवा मठाचा राहिलेला नसून, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह संपूर्ण देशातील सर्वधर्मीय व प्राणिप्रेमींच्या भावनांचा एक अनोखा संगम बनला आहे. त्यामुळे नांदणी मठात महादेवी हत्तीण परत कधी येणार याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

इ.स. ७०१ मध्ये स्थापन झालेल्या नांदणी पीठाच्या अधिपत्याखाली दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील तब्बल ७४३ गावे येतात. प्राचीन काळापासून मठात चालत आलेल्या हत्ती परंपरेचा मान १९९२ सालापासून ‘महादेवी’ने अत्यंत अखंडपणे सांभाळला. मठातील धार्मिक विधी, मिरवणुका आणि पंचकल्याणक सोहळ्यांची शान असलेली महादेवी केवळ एक प्राणी नव्हती, तर लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि आपुलकीचा मुख्य आधार होती.

‘पेटा’ची तक्रार ते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

सन २०२३ मध्ये पेटा संस्थेने महादेवीच्या आरोग्याबाबत केलेल्या तक्रारीनंतर घटनाक्रमाला नाट्यमय वळण मिळाले. न्यायालयीन लढाई, उच्चस्तरीय समितीचे अहवाल आणि १६ जुलै २०२५ चा उच्च न्यायालयाचा निकाल यानंतर महादेवीला जामनगरच्या वनतारा पुनर्वसन केंद्रात हलवण्याचे आदेश देण्यात आले. २८ जुलै २०२५ चा तो दिवस नांदणीकर कधीही विसरू शकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर जेव्हा महादेवीला नेण्यासाठी वनताराची टीम गावात दाखल झाली, तेव्हा हजारो नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर आला होता. गावाने उत्स्फूर्त ‘मूक मोर्चा’ काढून, गाव बंद ठेवून आपल्या लाडक्या माधुरीची भावुक बिदाई केली. निरोपाच्या त्या क्षणी खुद्द महादेवीच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू संपूर्ण देशाचे काळीज पिळवटून टाकणारे ठरले.

आशेचा नवा किरण : नांदणीत पुनरागमनाची तयारी सुरू

गेल्या वर्षभरात न्यायालयीन प्रक्रियेने अनेक वळणे घेतली. मठात महादेवीच्या संगोपनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च २०२६ मध्ये जागेच्या काही तांत्रिक अडचणी आल्या, तरीही भाविकांची जिद्द कमी झाली नाही. अखेर १६ जून २०२६ पासून वनताराचे पथक नांदणीत दाखल झाले असून, महादेवीच्या निवासासाठी व आरोग्यासाठी आवश्यक सर्व अत्याधुनिक सुविधांचे काम वेगाने करण्यात आले. २३ जून रोजी झालेल्या सुनावणीत उच्चस्तरीय समितीला ५ ऑगस्टपर्यंत या सर्व सुविधांची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लढाई सन्मानाची आणि पुनर्स्थापनेची!

महादेवीच्या विरहानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात आंदोलनाची ठिणगी पडली. ७४३ गावांतील ग्रामपंचायतींनी महादेवीला पूर्ववत नांदणी मठात आणण्यासाठी ठराव मंजूर करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठवले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील १३ तासांची विराट पदयात्रा, राज्यभरात निघालेले निषेध मोर्चे, राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनतारा यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका या सर्वांनी हे सिद्ध केले की, महादेवी हत्तीण ही आता एका मठापुरती मर्यादित न राहता देशाच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू बनली आहे.

उत्कंठा शिगेला!

आज महादेवीच्या विरहाला एक वर्ष पूर्ण होत असताना, नांदणीकरांच्या आणि कोट्यवधी भाविकांच्या मनात एकच सवाल आणि एकच आस आहे. ‘अश्रूंनी निरोप दिलेली आपली माधुरी पुन्हा एकदा नांदणी मठाच्या अंगणात कधी अवतरेल?’ सध्या नांदणीत सुरू असलेले कामाचे गतिमान चक्र पाहता महादेवीचा वनतारातील प्रवास आता संपून ती लवकरच आपल्या हक्काच्या घरात, म्हणजेच नांदणी मठात परतणार, या आशेने हजारो भाविकांचे डोळे आजही मठाच्या वेशीकडे लागून राहिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT