कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
इन्स्टाग्रामवर बनावट नोटांची जाहिरात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोटा मिळतील असा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १ लाख रूपयांत ५ ते १० लाख रूपयांच्या बनावट नोटा मिळतील अशी जाहिरात करण्यात आली आहे. दरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ५००, २०० आणि १०० रूपयांच्या नोटांचा समावेश आहे.
इन्स्टाग्रामवर बनावट नोटा विक्री करण्याऱ्या रील्सचा सुळसुळाट दिसून येत आहे. नोटांची बंडल दाखवत अनेक instagram account वरून जाहिरात करण्यात येत आहे. अधिक पैशांच्या हव्यासानं अनेकांची फसगत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मराठी नावांचा वापर करून मराठी लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या व्हिडिओमध्ये एक लाल टी शर्ट घातलेली व्यक्ती नोटांच्याच बंडलवर बसलेली असून, त्याच्या हातात नोटांचे बंडल दाखवत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नोटा मोजण्याचे मशीनही या ठिकाणी दिसत असून, त्या मशिनमध्ये नोटा टाकून मोजल्या जात असल्याचेही दाखवण्यात येत आहे. पोलिस या घटनेची दखल घेणार का? आणि अशा लोकांवर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.